कोरोनाच्या सावटाखाली भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम आयोजित करण्यात आला होता. परंतु कडक निर्बंधानंतरही जैव सुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ४ मे रोजी आयपीएलचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. तत्पुर्वी बऱ्याच क्रिकेटपटूंनी दुखापतीमुळे किंवा कोविड-१९ च्या कारणामुळे अर्ध्यातून माघार घेतली होती. याच साखळीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याचेही नाव जोडले गेले असते. याबद्दल स्वत: चहलनेच खुलासा केला आहे.
आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित झाला नसता तरीही आपण हंगाम अर्ध्यात सोडून जाणार गेलो असतो, असे चहलने सांगितले आहे. यामागचे कारण म्हणजे, त्याच्या आई-वडिलांना कोरोनाचे संक्रमण झाले होते.
चहलच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला होता. कोरोना संक्रमणानंतर त्याच्या आईची तब्येत लवकर बरी झाली होती; परंतु त्याच्या वडिलांची ऑक्सिजन पातळी खूप कमी झाली होती. त्यामुळे चहल खेळावर लक्ष केद्रिंत करु शकत नव्हता.
इंडिया टुडेशी याबाबत बोलताना चहल म्हणाला की, “माझ्या आई-वडिलांचा कोरोनाची बाधा झाली असल्याचे कळाल्यानंतर मी आयपीएलमधून विश्रांती घेण्याचे ठरवले होते. एखाद्याचे आई-वडिल घरी एकटे असतील, तर त्याच्यासाठी केळावर लक्ष केंद्रित करणे खूप अवघड जाते.”
“माझ्या वडिलांना ३ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएल स्थगित झाली. त्यांची ऑक्सिजन पातळी ८५-८६ पर्यंत कमी झाली होती. त्यामुळे आम्हाला त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. ते नुकतेच घरी परतले आहेत. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अजूनही पॉझिटिव्ह आहे. परंतु त्यांची ऑक्सिजन पातळी संतुलित असल्याने मी आनंदी आहे. त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून ७-१० दिवस लागतील,” असे पुढे चहल म्हणाला.
दुर्दैवाची बाब म्हणजे, कोविड-१९ मुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियुष चावला, आयपीएलमध्ये समालोचन करणारा आरपी सिंग यांनीही त्यांच्या वडिलांना गमावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संकटमोटक! पंतच्या ३ खास खेळी, जेव्हा कठीण परिस्थितीत विरोधकांची धुलाई करत जिंकले होते सामने
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी न्यूझीलंडचा ‘हा’ क्रिकेटपटू चढला बोहल्यावर, शेअर केला लग्नाचा फोटो
चेंडू झेलताना यष्टीरक्षकाचा घसरला पाय, कोलांटी उड्या मारत पडला मैदानावर; Video पाहून व्हाल लोटपोट