काल (3 मार्च) ईडन गार्डन येथे बंगाल विरुद्ध कर्नाटक संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडला. हा सामना बंगालने 174 धावांनी जिंकत 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
बंगालच्या या विजयात गोलंदाज मुकेश कुमारने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. यानंतर 9 मार्चला सुरु होणाऱ्या अंतिम सामन्यात बंगालचा सामना गुजरात आणि सौराष्ट्र संघात राजकोट येथे सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्या संघाबरोबर होईल.
बंगालकडून कर्नाटकविरुद्ध दुसऱ्या डावात मुकेशने 61 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बंगालने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कर्नाटकचा दुसरा डाव 55.3 षटकात 177 धावांवर संपुष्टात आला. यावेळी कर्नाटककडून फलंदाजी करताना देवदत्त पडीक्कलने 129 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. यामध्ये 7 चौकारांचा समावेश आहे.
तसेच अभिमन्यू मिथूनने 38 आणि रवीकुमार समर्थने 27 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
तसेच बंगालकडून मुकेश बरोबरच इशान पोरेल आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी बंगालने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वबाद 161 धावा केल्या होत्या. पण त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 190 धावांच्या आघाडीमुळे कर्नाटकला 352 धावांचे आव्हान दिले होते. बंगालकडून दुसऱ्या डावात सुदीप चॅटर्जी आणि अनुस्तुप मुजुमदार या दोघांनाच 40 धावांचा टप्पा ओलांडता आला. चॅटर्जीने 45 तर मुजुमदारने 41 धावा केल्या. या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी लवकर विकेट्स गमावल्या. कर्नाटककडून या डावात अभिमन्यू मिथूनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्याआधी बंगालकडून पहिल्या डावात मुजुमदारने शानदार शतकी खेळी करताना 207 चेंडूत 21 चौकार 3 षटकारासह नाबाद 149 धावांची खेळी केली होती. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर बंगालले सर्वबाद 312 धावसंख्या उभारता आली होती.
त्यानंतर फलंदाजी करताना कर्नाटकचा पहिला डाव मात्र केवळ 122 धावांवर संपुष्टात आला होता. या डावात कर्नाटककडून कृष्णप्पा गॉथमने सर्वाधिक 31 धावा केल्या होत्या. तर बंगालकडून इशान पोरेलने 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
बंगालने कर्नाटक विरुद्ध चमकदार कामगिरी करत आता अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. याआधी 2007 ला बंगाल अंतिम सामना खेळला होता. पण त्यावेळी अंतिम सामन्यात मुंबईने त्यांना 132 धावांनी पराभूत केले होते. तर त्याआधी 1989-90 च्या रणजी ट्रॉफी मोसमात बंगाल संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. तसेच त्यावेळी बंगालने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली पण आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखले
–टीम इंडिया नक्कीच वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचेल, या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा विश्वास
–कपिल देव म्हणतात, विराटच्या खराब फॉर्मसाठी ही गोष्ट जबाबदार