बिहारचा २२ वर्षांचा फलंदाज साकिबुल गनी (Sakibul Gani) याने पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. हा विक्रम करणारा तो जगातला पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. गनीने कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर मिझोरामविरुद्ध खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी( ranji trophy 2022) सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात धमाका केल्यानंतर तो लगेचच प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याच्या या यशामागे त्याच्या आईचे खूप मोठे योगदान आहे.
साकीबुल गनी हा भारतीय क्रिकेटचा नवा स्टार म्हणून उदयास आला आहे. पण त्याला स्टार बनवण्यामध्ये त्याच्या आईचे खूप मोठे योगदान आहे. गनी इथपर्यंत खूप संघर्ष करून पोहचला आहे.
क्रिकेटची चांगली बॅट ३० ते ३५ हजार रुपयांना मिळते. गरीब कुटुंबातील गनी याच्याकडे ही एवढी मोठी रक्कम नव्हती. अशा स्थितीत त्याच्या आईने आपले दागिने गहाण ठेवून ही बॅट मुलाला घेऊन दिली आणि एक दिवस आपला मुलगा या बॅटने आपले स्वप्न पूर्ण करेल असे स्वप्न पाहिले. गनीला त्याचे शस्त्र मिळाले आणि त्याने हे शस्त्र आपल्या पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात अशा प्रकारे वापरले की जगभर त्याचे कौतुक होते आहे. गनीने रणजी ट्रॉफी सामन्यात मिझोरामविरुद्ध ४०५ चेंडूत ३४१ धावा केल्या होत्या. त्याने या खेळीत तब्ब्ल ५६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.
शेतकरी कुटुंबातील गनीला क्रिकेटमध्ये उतरण्यात त्याच्या मोठ्या भावाचीही साथ मिळाली आहे. तसेच त्याच्या आई-वडिलांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. गनीनं वयाच्या ७व्या वर्षीच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. त्याचे वडील मोहम्मद मन्नान यांनी सांगितले की, गनी त्याच्या मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायचा.
साकिबूल गनीचे हे पहिले त्रिशतक नाही. त्याने २३ वर्षाखालील स्पर्धेतही ३०६ धावांची खेळी केली आहे. त्याचबरोबर त्याने दोन द्विशतकही झळकावली आहेत. क्रिकेटमुळे तो अभ्यासात मागे पडला. त्याने १२ वीची परीक्षा दिलेली नाहीये. गनी वेगवान गोलंदाजी देखील करतो. त्याने १४ लिस्ट-ए मॅचमध्ये ३१ च्या सरासरीने ३७७ धावा केल्या असून ४ विकेट्सही घेतल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमधील ९ डावात २७ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या ३१ व्या वर्षी ‘या’ महिला भारतीय सलामीवीराने क्रिकेटला केला अलविदा, अशी राहिलीय कारकिर्द
Photo: मैदानात शत्रू, मैदानाबाहेर मित्र!! सूर्यकुमार आणि पोलार्डमधली बॉन्डिंग जिंकले तुमचेही मन
ओदिशाला नमवून माजी विजेत्या बंगलोरने उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही राखले कायम!