जगभरातील अनेक देशांप्रमाणे भारतातही गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. असे असताना कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश करायच्या आधीच आयपीएलवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. आत्तापर्यंत आयपीएलशी जोडलेले अनेक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आत्तापर्यंत ४ खेळाडू पॉझिटिव्ह
ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ४ खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज नितीश राणा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे देवदत्त पडीक्कल आणि डॅनिएल सॅम्स; तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
पण चांगली गोष्ट अशी की ज्यावेळी या खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यावेळी हे खेळाडू क्वारंटाईनमध्ये होते. तसेच राणा आणि पडीक्कल यांचे अहवाल त्यांनी हॉटेलमध्ये आगमन केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे ते संघाशी जोडले गेले आहेत. मात्र, अजून अक्षर आणि डॅनिएल यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले नाहीत.
किरण मोरे यांचा अहवालही पॉझिटिव्ह
मुंबई इंडियन्सचे यष्टीरक्षण मार्गदर्शक किरण मोरे यांचा कोरोना अहवाल देखील ६ एप्रिलला पॉझिटिव्ह आला. याबद्दल मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने असेही सांगितले की किरण मोरे यांनी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच त्यांना कोणतही लक्षणे नव्हती.
ब्रॉडकास्टींग टीमलाही कोरोनाचा विळखा
आयपीएल संघातील सदस्यच नाही तर आयपीएलचे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स या चॅनेलचे काही सदस्य देखील पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. माध्यमांतील वृत्तानुसार मुंबईमधील फाईव्ह स्टार हॉटेल फोर सिझन्समध्ये थांबलेले स्टार स्पोर्ट्सचे १४ कर्मचारी कोरोना संक्रमित झाले होते.
हे सर्व कर्मचारी बीसीसीआयच्या बायो-बबलचा भाग होते. या १४ कर्मचाऱ्यांमध्ये कॅमेरामन, प्रोड्युसर, डायरेक्टर व अन्य सहायकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही टीम वर्ल्ड फीड अर्थात जगात आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या टीमचा भाग आहेत.
ग्राऊंड स्टाफही कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक गोष्ट अशी की मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील काही कर्मचारी मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे मुंबईतील सामन्यांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. विशेष म्हणजे यंदा आयपीएलचे १० सामने मुंबईमध्ये होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा
“त्याने जर चांगली कामगिरी केली असती, तर तो इतक्या संघाकडून खेळलाच नसता”