एमएस धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच दरम्यान भारतीय संघातील मोहम्मद कैफ यशाच्या शिखरावर होता. परंतु मोहम्मद कैफला केवळ पुढील एक ते दोन वर्ष भारतीय संघात आपली जागा टिकवून ठेवण्यात यश मिळाले. त्यांनतर कैफला भारतीय संघात कधीही जागा मिळाली नाही. आता कैफने भारतीय संघातील जागा का गमवावी लागली, याचा गमतीदार खुलासा केला आहे.
धोनीसोबतची वागणूक पडली महागात?
मोहम्मद कैफने स्पोर्ट्स स्क्रीन सोबत बोलताना सांगितले की, “एकदा संपूर्ण भारतीय संघाला मी संध्याकाळी जेवणाचे आमंत्रण दिले होते. 2006 मध्ये नोएडा येथे मी भारतीय संघाला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. तेव्हा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली हे देखील आले होते. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देण्यात व्यस्त होतो. म्हणून मला एमएस धोनी यांच्यासारख्या युवा खेळाडूंकडे लक्ष देता आले नाही.”
मोहम्मद कैफने सांगितले की, “मी त्यावेळेस खूप नर्वस होतो. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारखे दिग्गज खेळाडू माझ्या घरी जेवणास आले होते. त्यांच्यासोबतच त्या काळातले प्रशिक्षक ग्रेग चेपल देखील आले होते. माझे संपूर्ण लक्ष सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दिग्गजांकडे होते. एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्यासह बाकी सर्व युवा खेळाडू वेगळ्या खोलीत बसले होते. परंतु मी या वरिष्ठ खेळाडूंसोबत व्यस्त होतो. माझे युवा खेळाडूंकडे लक्षही गेले नाही. त्यामुळेच हे माझे वागणे धोनीला आवडले नसावे.”
त्यानंतर मोहम्मद कैफ हसत म्हणाला की, “2007 मध्ये जेव्हा धोनी कर्णधार झाला तेव्हा मी संघात आपले स्थान मिळवू शकलो नाही. तो मला नेहमी जाणीव करून देत असतो की, ते जेव्हा माझ्या घरी आले होते तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. बहुधा मी त्यावेळी लक्ष न दिल्यानेच मला संघातील स्थान गमवावे लागले.”
मोहम्मद कैफने मजेशीर पद्धतीने सांगितले की, “धोनी कर्णधार होण्याआधी मी त्याला व्यवस्थित बिर्याणी वाढली नाही म्हणून मला ते बहुतेक महागात पडले. धोनीने त्यांनतर मला मजेशीर पद्धतीने टोमणा देखील मारला होत की जेव्हा तुम्ही माझ्या घरी याल तेव्हा मीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही.”
महत्वाच्या बातम्या:
इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी
चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह या खेळाडूंना मिळाले नामांकन