पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २०२२-२३च्या केंद्रीय कराराचा भाग म्हणून खेळाडूंसाठी अनेक नवीन नियम लागू केले आहेत. खेळाडूंनी त्यांच्यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठा दंड आणि अगदी बंदी देखील भोगावी लागू शकेल. कर्णधार बाबर आझमसह वरिष्ठ क्रिकेटपटूंनी काही कलमांवर आक्षेप घेतला होता, परंतु आता काही बदलांसह एका आठवड्यानंतर करारावर स्वाक्षरी केली आहे. खालच्या स्तरातील खेळाडूंनी कोणत्याही भागावर आक्षेप घेतला नाही, परंतु काही वरिष्ठ खेळाडूंनी स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांच्या वकिलांशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन कायद्यानुसार मैदानाबाहेरील स्पर्धांमध्ये ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंना २५ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. त्याच वेळी, प्रशिक्षण, मुलाखत आणि सादरीकरण कार्यक्रमांमध्ये उल्लंघन केल्याबद्दल ५०हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. व्यावसायिक प्रकल्यांच्या बाबतीत खेळाडूंनी विशिष्ट कलमांवर आक्षेप घेतला होता. त्या नियमांमध्ये म्हटले आहे की, “जर खेळाडूंनी पीसीबीच्या परवानगीशिवाय कोणत्याही उत्पादनाची जाहिरात केली तर त्यांना २,५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.”
मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यास मोठा दंड आणि बंदी
बोर्डाच्या कोणत्याही प्रायोजक किंवा भागीदारांशी भांडण केल्याबद्दल दंड ५लाख वरून ५० लाख पर्यंत आकारला जाईल आणि एक ते पाच सामन्यांची बंदी देखील घालता येईल. जर एखाद्या खेळाडूने देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बोर्डाने मंजूर केलेल्या ड्रेस कोडचे पालन केले नाही किंवा प्रायोजकाचा लोगो लपविला तर त्याला १.५ लाख ते १० लाखच्या दरम्यान दंड आकारला जाईल किंवा एक ते पाच सामन्यांची बंदी घातली जाईल. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामन्यात क्रिकेट किट किंवा उपकरणाच्या कोणत्याही भागावर अनधिकृत लोगो वापरल्यास ६० हजार ते १ लाख रुपये अतिरिक्त दंड आकारला जाईल. शिवाय जर खेळाडू जुगार किंवा मॅच फिक्सिंगसारख्या अनैतिक प्रकारात गुंतला असेल तर त्याला २ लाख ते २० लाख पर्यंत दंड किंवा एक ते पाच सामन्यांची बंदी घालण्यात येईल.
अयोग्य वर्तन केल्यास मोठा दंड आकारला जाईल
पंचांच्या निर्णयाची अवज्ञा करणे किंवा चुकीचे वागणे, सामना अधिकारी, खेळाडू किंवा प्रेक्षकांना धमकवणे, हात वर करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न केल्यास ५ लाख ते ५० लाख रुपये दंड किंवा तीन ते आठ सामन्यांसाठी बंदी घालण्यात येईल. एखाद्या खेळाडूने खेळाडू, सामना अधिकारी, पीसीबी अधिकारी किंवा चाहत्याविरुद्ध अपशब्द वापरल्यास त्याला ५ लाख ते ५० लाख पर्यंत दंड आणि एक ते पाच सामन्यांची बंदी घालण्यात येईल. जर एखाद्या खेळाडूने डोपिंग किंवा फिटनेस चाचणी घेण्यास नकार दिला किंवा पीसीबीच्या इतर कोणत्याही आदेशाकडे दुर्लक्ष केले तर त्याला १.५ लाख ते १० लाख रुपये दंड आकारला जाईल.
अवैध ड्रग्ज घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली
बेकायदेशीर औषधांचा वापर, वितरण किंवा पूरक आहार घेणे इत्यादींवर ७.५ लाख ते ५० लाख पर्यंतचा दंड किंवा तीन ते आठ सामन्यांसाठी बंदी घातली जाईल. बोर्डाच्या परवानगीशिवाय क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतल्यास ५ लाख ते ५०लाख इतका दंड किंवा एक ते पाच वर्षांची बंदी घातली जाईल. सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित ठिकाणी मोबाइल फोन वापरल्यास ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
दरम्यान, पीसीबीने जारी केलेल्या यानव्या नियमावलीवर कर्णधार बाबर आझमसह अनेक मोठ्या खेळाडूंनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या करारामध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर काही अटी शर्ती मंजूर करून सध्या ३३ पाकिस्तानी खेळाडूंनी हा करार मान्य केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देखील दिल्याचे जारी करण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंग्लंड बोर्डाचा ‘या’ खेळाडूवर अन्याय, थेट गोलंदाजीवरच आणली बंदी
सीएसकेची मालकी असलेल्या ‘या’ संघाचा मेंटॉर नाही बनू शकणार धोनी, बीसीसीआय ठरलीय कारण
भारतीय खेळाडूचा टी२० लीगमध्ये शतकी तडाखा, अजून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पणही नाही झाले