आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबरला) हंगामातील ३५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (सीएसके वि. आरसीबी) यांच्यात खेळला गेला. यामध्ये धोनीच्या सीएसकेने आरसीबीवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर धोनीने सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोची खूप प्रशंसा केली आहे. धोनीने ब्रावोला त्याच्या भावाप्रमाणे असल्याचेही सांगितले आहे. तसेच त्या दोघांमध्ये कोणत्या कारणास्तव वाद होतात? हे देखील सांगितले आहे.
आरसीबीविरुद्धचा सामना जिंकण्यामध्ये अष्टपैलू ड्वेन ब्रावोचे मोठे योगदान राहिले आहे. या विजयानंतर चेन्नई संघ आयपीएलच्या गुणतालीकेत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात ब्रावोने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये त्याने २४ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही मिळवल्या आहेत. या विकेट्समध्ये आरसीबी कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या दिग्गजांचाही समावेश होता. त्याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ब्रावोला सामनावीर निवडले गेले.
सामन्यातील विजयानंतर धोनीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “आमच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की तो (ब्रावो) फिट आहे. तो त्याचा प्लॅन योग्यप्रकारे अंमलात आणत आहे. आमच्या दोघांमध्ये नेहमी त्याच्या स्लोअर बाॅल टाकण्याविषयी वाद होतात. मी त्याला सांगतो की, हे सर्वांना माहित आहे की, तु मंदगतीने चेंडू टाकतो. त्यामुळे मी त्याला एका षटकात ६ वेगवेगळे चेंडू टाकायला सांगतो. जेव्हा कधी त्याला संधी मिळाली आहे, त्याने त्याची जबाबदारी चांगली पार पाडली आहे.”
नुकत्याच पार पडलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये ब्रावोने दुखापतीमुळे शेवटच्या चार सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. मात्र, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने पहिल्या सामन्यापासूनच चांगल्या प्रदर्शनाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १५७ धावांचे आव्हान दिले होते आणि सीएसकेने ते आव्हान १८.१ षटकात आणि केवळ ४ विकेट्सच्या नुकसानासह पार केले आहे. चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तसेच सलामीवीर डू प्लेसिसने ३१ आणि अंबती रायडूने ३२ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
नादच नाय! हुड्डाचा पूर्ण ताकदनिशी फटका अन् हैदराबादच्या पठ्ठ्याचा हवेत उडत एकहाती ‘ब्लाइंडर कॅच’
रेकॉर्ड अलर्ट! फिरकीपटू अश्विनच्या टी२०तील २५० विकेट्स पूर्ण, आता फक्त ‘ते’ दोघे भारतीय पुढे