पुणे ३ ऑक्टोबर २०२३ – एसएनबीपी १६ वर्षांखालील अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत ध्यानचंद अकादमी संघाने निर्विवाद वर्चस्वासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. या वर्षी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा हा पहिला संघ ठरला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटात मंगळवारी ध्यानचंद हॉकी अकादमी संघाने तमिळनाडू हॉकी अकादमीचा ५-० असा पराभव केला. कर्णधार तुषार शर्माने १२व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर रितेश पांडे, मनजितसिंह चौहान, मिथिलेश यादव, जयहिंद यादव यांनी अन्य गोल केले.
गतविजेत्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) संघाने आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात करताना क गटातील पहिल्या सामन्यात स्मार्ट हॉकी अकादमीवर ६-१ असा विजय मिळविला. एफ गटातील सामन्यात आर्मी बॉईज स्पोर्स्ट संघाने आक्रमक खेळ करताना ग्रासरुट हॉकी अकादमी संघावर १३-० असा दणदणीत विजय मिळविला. हा त्यांचा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. कर्णधार मनजितने चार गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने चारही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. अन्य एका सामन्यात ई गटातून हॉकी नाशिक संघाने कोलकता वॉरियर्स संघाचा ५-१ असा पराभव केला.
दरम्यान सोमवारी उशिरा झालेल्या सामन्यात सुखजीवन स्पोर्टस अकादमी संघाने अन्वर हॉकी अकादमी संघाचा २३-० असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत वीसहून अधिक गोल करणारा हा दुसरा संघ ठरला. या विजयात मनिष कुमारने १४, १६, ३०, ५१, ५२, ५४ आणि ६०व्या मिनिटाला असे ७ गोल केले. दिव्यांशु शर्माने तीन गोल करताना त्याला सुरेख साथ केली.
या स्पर्धेत आतापर्यंत अ गटातून तमिळनाडू हॉकी (१ विजय, १ पराभव), रायन इन्स्टिट्यूट (२ पराभव), ब गटातून महाराष्ट्र स्कूल्स स्पोर्ट्स संघटना ९१ विजय, १ पराभव), टाटा स्टिल (दोन पराभव), क गटातून स्मार्ट हॉकी अकादमी (२ पराभव), फ गटातून ग्रासरुट अकादमी (२ पराभव), ई गटातून कोलकता वॉरियर्स (२ पराभव) आणि ग गटातून अन्वर हॉकी अकादमी (२ पराभव) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली एस.ई. सोसायटीच्या एसएनबीपी संस्था समूहाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मंगळवारी झालेल्या चार सामन्यात तीस गोलची नोंद झाली.
आजचे निकाल –
(सोमवारचा सामना) ग गट – सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी, आग्रा २३ (कुणाल सिंह ३रे मिनिट, अमित कुमार चौधरी ५४, ६०वे मिनिट, दिव्यांशू शर्मा ५७, ५८, ५९वे मिनिट, शेखर धनुक ४७, ५६वे मिनिट, नितीश यादव ४८, ५३वे मिनिट, रोहित कुशावह ४९वे मिनिट) वि.वि. अन्वर हॉकी सोसायटी ० मध्यंतर ९-०
सी गट – एसजीपीसी अमृतसर ६ (जगजित सिंग १४वे मिनिट, गुरप्रीतसिंह २३वे मिनिट, हरजित सिंग ३८, ४२, ५५वे मिनिट, राजदीप सिंग ५३वे मिनिट, अर्षदीप सिंग ५८वे मिनिट) वि.वि. स्मार्ट हॉकी अकादमी १ (बजरंगी सिंग ४२वे मिनिट) मध्यंतर २-०
फ गट – आर्मी बॉईज स्पोर्ट्स अकादमी १३ (समीर ५, ३५वे मिनिट, साहिल कुमार १०वे मिनिट हरपाल १६, ३३, ३४ वे मिनिट, मनजित २१, ४२, ४३, ४६वे मिनिट, भावुक २५, ३७, ४७वे मिनिट) वि.वलि. ग्रासरुट हॉकी ० मध्यंतर ५-०