इंग्लंडचे सर इयान बोथम हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहेत, यात कोणातेच दुमत नाही. सर गारफिल्ड सोबर्स, इम्रान खान, कपिल देव, जॅक कॅलिस यांच्यासोबत अव्वल पाच अष्टपैलू खेळाडूंमध्ये बोथम यांची गणना केली जाते. या अशा महान खेळाडूसोबत तुलना केली जाणे, हे कोणत्याही युवा खेळाडूसाठी कौतुकाची पावती असते. अशाच एका इंग्लिश खेळाडूंची तुलना बोथम यांच्यासोबत केली होती तो खेळाडू म्हणजे इंग्लंडचा डॉमिनिक कॉर्क.
७ ऑगस्ट १९७१ मध्ये डॉमिनिक याचा जन्म इंग्लंडमधील न्यूकॅसल या ठिकाणी झाला. घरातच खेळाचे वातावरण होते. आजोबा आणि काका फुटबॉल खेळत मात्र डॉमनिकला क्रिकेटमध्ये रस होता. वेगवान गोलंदाजी आणि खालच्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे त्याची ओळख अष्टपैलू म्हणून झाली.
१९८९ मध्ये काउंटी क्लब स्टॅफोर्डशायर संघाने त्याची प्रतिभा ओळखत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्याच वर्षी त्याची निवड इंग्लंडच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात झाली. एका वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याने डर्बीशायर संघाने त्याला मोठी रक्कम देऊन आपल्या संघासाठी खेळण्याची विनंती केली. डर्बीशायर सोबत त्याने आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. सलग दोन वर्ष काउंटी क्रिकेट गाजवल्याने डॉमिनिकची निवड राष्ट्रीय संघात करण्यात आली. त्यावेळी त्याचे वय अवघे २१ वर्ष होते.
आपला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना डॉमिनिकने १९९२ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला. यानंतर मात्र, डॉमनिकला एकदिवसीय सामन्यांत जास्त संधी मिळाल्या नाहीत. १९९२ -१९९५ या काळात तो अवघे ६ वनडे खेळला.
१९९५ मध्ये त्याने आपली पहिली कसोटी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली. पहिल्या डावात तीस धावा केल्यानंतर, गोलंदाजीतही त्याला एकच बळी मिळाला. वनडेप्रमाणे कसोटी कारकीर्दही लयाला जाणार असे वाटत असतानाच, त्याने एकप्रकारे चमत्कारच केला.
वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १२४-३ अशा स्थितीत असताना, डॉमिनिकने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. वेस्ट इंडीजचे पुढचे सातही खेळाडू त्याने बाद केले. त्याने ४३ धावा देऊन ७ बळी आपल्या नावे केले. इंग्लंडकडून पदार्पणात केलेली ती सर्वोत्तम कामगिरी आहे. पुढच्या सामन्यात, त्याने लॉर्ड्सवर देखील पाच बळी घेत ऑनर्स बोर्डवर नाव लावले. दोन सामन्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच हॅट्रिक करण्याची किमया त्याने साधली. पीटर लोडर यांच्यानंतर हॅट्रिक घेणारा तो केवळ दुसरा गोलंदाज होता. त्या संपूर्ण मालिकेत डॉमिनिकने २६ बळी मिळवले. फलंदाजी देखील आपले पहिले अर्धशतक चौथ्या सामन्यात पूर्ण केले. प्रसारमाध्यमांनी त्याला ‘नवा बोथम’ असे विशेषण लावले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात देखील त्याने आपली शानदार कामगिरी कायम राखली. त्या दौऱ्यावर १९ बळी त्याने आपल्या नावे केले. एकदिवसीय मालिकेत संधी मिळाल्यावर तिथेही तो १० बळी घेण्यात यशस्वी ठरला. त्याचा अफलातून फॉर्म पाहता त्याची निवड भारतीय उपखंडात होणाऱ्या १९९६ विश्वचषकासाठी इंग्लंड संघात झाली. विश्वचषकातसुद्धा तो इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. १९९६ यावर्षीचा ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार त्याने आपल्या नावे केला.
१९९७ हे वर्ष मात्र त्याच्यासाठी जरा वाईट गेले. वैयक्तिक अडचणीमुळे त्याची कामगिरी खालावली. डॉमिनिकने १९९८ सुरू होताच पुन्हा आपली कला दाखवली. द. आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला असता, त्या मालिकेत डॉमनिकने १८ बळी घेतले. त्यानंतरच्या, अॅशेस मालिकेसाठी डॉमिनिकची निवड झाली. पहिल्या दोन सामन्यात अवघे चार बळी मिळवल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला.
२००० साली त्याने पुनरागमन केले. मात्र, आधीसारखी कामगिरी त्याला करता येत नव्हती. तो सारखा संघाच्या आतबाहेर होत राहिला. २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, डॉमनिकने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
डॉमिनिक कॉर्कची वनडे कारकीर्द तितकीशी चांगली राहिली नाही. मात्र, कसोटीमध्ये तो इंग्लंडचा मॅचविनर म्हणून समोर आला. ३७ कसोटी सामन्यात ८८४ धावांसह १३१ बळी त्याने आपल्या नावे केले. १९९० ते २०११ याकाळात डर्बीशायर, लॅन्कशायर व हॅम्पशायर या संघांसाठी प्रथमश्रेणी दर्जाचे क्रिकेट खेळताना ३२१ सामन्यात १०,११४ धावा व ९८९ बळी घेतले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर, २००७ पासून तो समालोचक म्हणून स्काय स्पोर्ट्ससाठी काम करतो.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: हे ५ फलंदाजांच्या बॅटमधून यंदा होऊ शकते षटकारांची बरसात
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळात क्रिकेटचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडचे होतेय कोटींचे नुकसान; बोर्ड घेणार मोठा निर्णय
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता