इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला होता. तर, लीड्सवरील कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत मालिका १-१ ने बरोबरीत राखली. आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन केले, खासकरून इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने.
अँडरसनने त्याच्या भेदक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना अनेक वेळा अडचणीत आणले. मात्र, अशात आता भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा हा भरवशाचा आणि अनुभवी गोलंदाज पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीनुसार त्याला पुढील सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो.
याबाबत अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांच्या खेळण्यातील अतिरिक्त भाराबाबत मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड म्हणाले, “मला यांना खाली बसवायचे नाही. मात्र, आमच्या पुढे आणखी खूप क्रिकेट सामने पडले आहेत. अशात कसोटी सामने नियमित आणि खूप पटापट होत आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.”
“या खेळाडूंनी क्रिकेटसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. दररोज जेव्हा आम्ही मैदानातून बाहेर येतो. तेव्हा आम्ही हाच विचार करतो की, यांच्यासाठी काहीतरी करावे. मात्र, मी सध्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाही,” असेही सिल्वरवूड म्हणाले.
असे असले तरी, अँडरसनने मात्र आधीच स्पष्ट केले होते की, तो या मालिकेतील सगळे कसोटी सामने खेळू इच्छित आहे. मात्र खेळाडूंवरील अतिरिक्त भार पाहता संघ व्यवस्थापक अँडरसनला पुढील सामन्यात आराम देऊ शकते. तसेच अँडरसनला यासाठी राजी करणे कठीण जाईल, असे देखील सिल्वरवूड यांनी मान्य केले. सध्या इंग्लंडसाठी अडचणीची बाब म्हणजे त्यांचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आहे, त्याने गोलंदाजीत म्हणावी तशी कामगिरी केली नाही.
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीने देखील भारतीय संघातील बदलांबाबत संकेत दिले होते. त्यामुळे पुढील कसोटी सामन्यात भारतीय संघात देखील काही बदल पाहायला मिळू शकतात. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारतापासून सावधच राहा! ऍडलेड कसोटीची आठवण करुन देत माजी इंग्लिश कर्णधाराचा यजमानांना इशारा
–इंग्लंडची महिला गोलंदाज केट क्रॉसला खेळायचंय चेन्नई सुपर किंग्स संघात, कारणही आहे विशेष
–जड्डू इस बॅक! लीड्समध्ये दुखापतग्रस्त झालेल्या जडेजाने चौथ्या कसोटीपूर्वी सुरु केला नेट्समध्ये सराव, पाहा फोटो