न्यूझीलंडमध्ये सध्या महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जात आहे. भारतीय महिला संघही न्यूझीलंडमध्ये या स्पर्धेत खेळत आहे. शनिवारी (१९ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाचा आमना सामना झाला. भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मात्र त्यांचा विजयरथ थांबू दिलेला नाही. असे असले तरी, भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने स्वतःच्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषकात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सर्वात यशस्वी फलंदाज बनली आहे. तिने या सामन्यात नाबाद ५७ धावा केल्या. त्यामुळे हरमनप्रीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) सर्वाधिक धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात आतापर्यंत २७० धावा केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj ) आहे. मितालीने शनिवारच्या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. या अप्रतिम प्रदर्शनानंतर मिताली ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज बनली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३८ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या माजी खेळाडू डेबी हॉकले (Debbie Hockley) आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात खेळताना २३४ धावा केल्या आहेत.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ विकेट्सच्या नुकसानावर २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ४ विकेट्सच्या नुकसानाव ४९.३ षटकात २८० धावा केल्या आणि ६ विकेट्स शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेचा विचार केला, तर ऑस्ट्रेलिया संघाचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलियाने ५ सामने खेळले आणि सर्वच्या सर्व जिंकले. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिकेने ४ सामने खेळले आणि सर्वच्या सर्व जिंकले आहेत. वेस्ट इंडीजने ५ पैकी ३ सामने जिंकले आणि त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
महिला विश्वचषक: भारताला नमवत ऑस्ट्रेलियाचा सलग ५वा विजय, मिताली अन् कंपनीचा सेमीफायनचा मार्ग कठीण
‘यश त्यांचे, अपयश माझे’, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा आयपीएलसाठी मंत्र
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: भारताच्या लक्ष्य सेनचे पदक पक्के, पुलेला गोपीचंद यांच्या मुलीचाही विजय