ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ डिसेंबर) झाला. या सामन्यात भारताने ६ गड्यांनी विजय मिळवून टी२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. वनडे मालिकेतील पराभवानंतर टी२० मालिकेतील विजय भारतासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांचे आव्हान भारताने अखेरच्या षटकात पूर्ण केले. हे विजयी लक्ष पूर्ण करताच भारताने टी२० मध्ये सातव्यांदा १९० पेक्षा अधिक धावांचे आव्हान पूर्ण करण्याची कामगिरी केली.
भारताने मिळवला दिमाखदार विजय
पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ विजयाच्या उद्देशाने आज सिडनीच्या मैदानात उतरला होता. सिडनीच्या फलंदाजांसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक ५८ धावा काढल्या. भारताकडून दुसरा टी२० सामना खेळणाऱ्या टी नटराजनने २० धावांत दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल व शिखर धवन यांनी भारताला स्फोटक सुरुवात दिली. भारताने पहिल्या सहा षटकात ६० धावा फटकावल्या. शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावले. अखेरीस, श्रेयस अय्यर व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी ४६ धावांची मॅचविनिंग भागीदारी करत, भारताला १९५ धावांचे लक्ष्य गाठून दिले. सामनावीराचा पुरस्कार आक्रमक ४२ धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याला देण्यात आला.
सातव्यांदा पार केले १९० पेक्षा अधिक धावांचे आव्हान
भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे लक्ष्य पार करताच, सातव्यांदा १९० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारतीय संघाने २००६ पासून आजतागायत १३६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना ७ वेळा ही कामगिरी केली आहे. भारतापाठोपाठ या यादीत इंग्लंडचा क्रमांक लागतो. इंग्लंडने पाच वेळा १९० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले आहे.
या संघांनी देखील केली आहे ही कामगिरी
भारत आणि इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने चार वेळा १९० धावांचे लक्ष्य भेदले आहे. या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर वेस्टइंडिज व दक्षिण आफ्रिका यांची वर्णी लागते. या दोन्ही संघांनी अनुक्रमे तीन आणि दोन टी२० सामन्यांत १९० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.
८ डिसेंबर रोजी खेळवला जाणार अखेरचा सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या टी२० मालिकेतील अखेरचा सामना ८ डिसेंबर रोजी याच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. त्यानंतर, १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…बेस्ट इन ब्ल्यू’, सामनावीर ठरलेल्या पंड्यासाठी मुंबई इंडियन्सचे खास ट्वीट
‘हिटमॅन’ने केले भारतीय संघाचे अभिनंदन, ट्वीट करत म्हणाला…
याला सातत्य असे नाव! भारतीय संघाची ‘ही’ कामगिरी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर