Loading...

आजही पुण्यातील त्या कसोटी सामन्याचं नाव काढलं की टेन्शन येतं

उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याला उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वा सुरुवात होईल.

भारताचा या मैदानावरील हा दुसराच कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने या मैदानावर पहिला सामना फेब्रुवारी 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. पण भारताला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक हारली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मॅट रेनशॉ आणि मिशेल स्टार्कने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 260 धावा केल्या होत्या. तसेच भारताचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने 105 धावांतच संपुष्टात आणला होता.

त्यामुळे 155 धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 285 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 441 धावांचे आव्हान दिले होते. या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 109 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

मात्र त्यानंतर 441 धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव केवळ 107 धावांवरच संपूष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात स्टिव्ह ओ किफने दोन्ही डावात प्रत्येकी 6 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका निभावली होती. भारताला या सामन्यात तब्बल 333 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

विशेष म्हणजे मागील 6 वर्षांपासूनचा भारताचा मायदेशातील हा एकमेव कसोटी सामन्यातील पराभव आहे. भारताने 1 जानेवारी 2013 पासून मायदेशात आत्तापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील केवळ गहुंजेला झालेल्या सामन्यात भारताने पराभव स्विकारला आहे. अन्य 24 सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

पण आता भारतीय संघ जवळ जवळ 2 वर्षांनंतर पुन्हा गहुंजेच्या स्टेडियमवर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघाची कामगिरी या मैदानावर कशी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loading...
You might also like
Loading...