ढाका। साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन कपच्या (सॅफ) अंतिम सामन्यात मालदीवने गतविजेत्या भारताचा 2-1 असा पराभव करत विजय मिळवला. यासोबतच मालदीवने आपले सॅफचे दुसरे विजेतेपद मिळवले.
ढाकाच्या बंगबंधु स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाने कोणताच बदल केला नाही. या सामन्यात भारत 4-4-2 आणि मालदिव 4-2-3-1 या फॉर्मेशनने खेळला.
यावेळी भारताने सुरूवात चांगली केली तर मालदीव बचावात्मक खेळ करत होता. मालदीवच्या इब्राहिम महूधीने 19व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. भारताच्या बाबतीत या स्पर्धेत पहिल्यांदाच असे घडले की विरुद्ध संघाने पहिला गोल केला.
पहिला गोल झाल्यावर मालदीवने त्यांचे हल्ले सुरूच ठेवले पण भारताने ते रोखून धरले. तर 30व्या मिनिटाला भारताला बरोबरी करण्याची संधी होती पण फारुख चौधरीच्या चुकीमुळे ती संधी हुकली.
यावेळी निखिल पुजारी आणि अनिरुद्ध थापाने त्यांचे प्रयत्न सुरुच ठेवले मात्र भारताला पहिल्या सत्रात गोल करता आला नाही. त्यातच कर्णधार सुबाशिश बोसला यलो कार्ड मिळाले. पहिले सत्र संपले असता मालदीवकडे 1-0 अशी आघाडी होती.
पहिल्या सत्रात निराशाजनक खेळ झाल्याने भारताने दुसऱ्या सत्राला आक्रमक सुरूवात केली. यामध्ये भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्टंटाइन यांनी संघात बदल करत जर्मनप्रीत सिंगच्या जागी देविंदर सिंगला घेतले. यावेळी भारताने केलेले हल्ले मालदिवचा गोलकिपर मोहमद फैजलने उत्तम रोखले.
अली फसिरने 66व्या मिनिटाला गोल करत मालदीवचा विजय जवळपास निश्चित केला. तसेच अधिक वेळेत भारताकडून सुमित पास्सीने 92व्या मिनिटाला गोल करत सामना 2-1 असा केला.
या सामन्याआधी भारत हा एकमेव संघ या स्पर्धेत अपराजित होता. त्यांनी साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 2-0 आणि मालदीवला 2-0 असे पराभूत करत उपांत्य फेरीत पाकिस्तानला 3-1 असे लोळवले होते.
मालदीवने उपांत्य सामन्यात नेपाळला 3-0असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
याच मैदानावर 2009ला भारत विरुद्ध मालदिव हा सामना भारताने पेनाल्टीत जिंकला होता. तसेच भारताने तीन वेळा उपांत्य फेरीत मालदीवचा पराभव केला होता.
भारताने या स्पर्धेचे 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011 आणि 2015 तसेच मालदीवने 2008 विजेतेपद पटकावले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप ही विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणीसाठी उत्तम संधी – रोहित शर्मा
–भारताच्या या हॉकीपटूचे नाव आढळले नाडाच्या यादीत