कोरोना महामारीमुळे बंद असलेली खेळांची मैदाने खेळाडूंनी सजू लागली आहेत. इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामाची तयारी करण्यासाठी, चार संघ गोव्यात पोहोचले आहेत. या संघांनी हंगामपूर्व सराव शिबिराला सुरुवात देखील केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे, ही स्पर्धा फक्त गोव्यात खेळवली जाणार आहे.
आयएसएलमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला वगळता, इतर संघांना सरावासाठी स्वतंत्र मैदाने दिली गेली आहेत. ईस्ट बंगालचा लीगमध्ये उशिराने समावेश झाल्याने त्यांना, स्वतंत्र मैदान देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
एफसी गोवा, बेंगलोर एफसी, हैदराबाद एफसी आणि केरळ ब्लास्टर्स या चार क्लबनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांच्या खेळाडूंनी मैदानावर प्रशिक्षण सुरू केले आहे. ईस्ट बंगाल वगळता इतर सहा संघांना या आठवड्याच्या सुरुवातीला मैदाने उपलब्ध करून देण्यात येतील.
कोरोना विषाणूमुळे, दोन महिने पुढे ढकललेला, आयएसएलचा सातवा हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गोव्यातील तीन मैदानावर खेळविण्यात येईल.