‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 1 डाव आणि 114 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. यासह दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची 2003 मध्ये सुरू झालेली कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्यानं शेवटच्या सामन्यातील दोन डावात मिळून एकूण 4 विकेट घेतल्या.
जेम्स अँडरसननं त्याच्या 21 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीत अनेक मोठे विक्रम रचले. अँडरसनचे काही असे विक्रम आहेत, जे येत्या भविष्यात कोणालाही मोडणं जवळपास अशक्य आहे. चला तर मग, या बातमीद्वारे जेम्स अँडरसनच्या अशाच काही विक्रमांवर एक नजर टाकूया.
(1) सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज – जेम्स अँडरसन क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून निवृत्त झाला आहे. अँडरसननं त्याच्या कारकिर्दीत एकूण 188 कसोटी सामने खेळले. एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं इंग्लंडसाठी 400 सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावावर एकूण 991 विकेट आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 704, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 आणि टी20 क्रिकेटमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आहे. त्याच्या नावावर 949 विकेट्स आहेत. आजच्या युगात वेगवान गोलंदाजांना नियमित दुखापत होत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत 900 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणे कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी अशक्य वाटतं.
(2) इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी – क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्यानं आपल्या कारकिर्दीत एकूण 200 सामने खेळले. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर जेम्स अँडरसन आहे. त्यानं आपला 188 वा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. अशाप्रकारे तो इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. अँडरसननं 2003 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा दुसरा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड आहे, ज्यानं 167 सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. सध्याच्या खेळाडूंमध्ये जो रूट (141) यानं इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळले आहेत.
(3) 700 कसोटी बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज – कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) आहेत. तर जेम्स अँडरसन यानं एक वेगवान गोलंदाज म्हणून 700 हून अधिक कसोटी बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या आधी अशी कामगिरी कोणताच खेळाडू करू शकला नव्हता. अँडरसनची कसोटी कारकीर्द 704 विकेट्ससह संपली. सध्या कोणत्याही वेगवान गोलंदाजाला 400 बळीही पूर्ण करता आलेले नाहीत. अशा परिस्थितीत 700 बळींचा टप्पा पार करणं अशक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत! जेम्स अँडरसननं विजयासह घेतला निरोप
जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू
3 खेळाडू जे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात, गंभीरनं सुचवलं या विदेशी खेळाडूचं नाव