न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सन पिता बनला आहे. विलीयम्सनची पत्नी साराह रहीम हिने आज (१६ डिसेंबर) एका गोंडस मुलीला जन्म दिला. केन विलियम्सनने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरुन मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. प्रथमच पिता बनल्याबद्दल क्रिकेट जगतातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी विलियम्सनचे अभिनंदन केले.
इंस्टाग्रामवरून दिली माहिती
न्यूझीलंडचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार असलेल्या केन विलियम्सनची पत्नी साराह रहीम हिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. साराहही ब्रिस्टल येथे शिक्षण घेतल्यानंतर नर्स म्हणून काम करते. विलियम्सनने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून मुलीसोबतचा फोटो शेअर करताना लिहले,
‘आमच्या कुटुंबात मुलीच्या आगमनाने आम्ही अत्यंत खूष झालो आहोत.’
विलियम्सनने घेतली होती पालकत्व रजा
केन विलियम्सनने पहिल्या बाळाच्या जन्मावेळी पत्नीसोबत राहता यावे म्हणून वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यासाठी त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे रीतसर पालकत्व रजा मागितलेली. तत्पूर्वी, विलियम्सनने पहिल्या कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्तम २५१ धावांची खेळी केली. काल जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
अनेकांनी केले अभिनंदन
केन विलियम्सन पिता झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडिया वरून त्याचे अभिनंदन केले. विलियम्सनला सर्वप्रथम भारताचा सलामीवीर व एकेकाळी त्याच्यासोबत सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळणारा शिखर धवन याने शुभेच्छा दिल्या. धवनने आपल्या संदेशात म्हटले,
‘खूप खूप अभिनंदन. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खुप सारे प्रेम.’
न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक व विलियम्सनचे चांगले मित्र मानले जाणारे माइक हेसन यांनीदेखील विलियम्सनला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, ‘केन आणि सारा तुमचे खूप अभिनंदन. तुमच्या दोघांसाठी मी अत्यंत आनंदी आहे. यानंतर येणारा काळ रोमांचकारी असेल.’
It's a girl! 👶
Congratulations to the New Zealand skipper ❤️
📸 Kane Williamson pic.twitter.com/EB6v5JDzqz
— ICC (@ICC) December 16, 2020
आयसीसीने देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केन विलियम्सन बाबा झाल्याचे औचित्य साधून त्याला शुभेच्छा दिल्या. केन विलियम्सन वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या आगामी टी२० मालिकेसाठी संघात परतेल, अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे.
महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– योगायोग आला जुळून! विराटसोबत आता हा खेळाडूही बनणार पहिल्यांदा बाबा, घेणार पालकत्व रजा
– न्यूझीलंडला मोठा धक्का! हा धडाकेबाज खेळाडू दीड महिन्यासाठी संघातून बाहेर