भारताच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या मागील अनेक वर्षांपासून कसोटी संघाचा सदस्य नाही. कारकीर्दीच्या सुरुवातीला तो कसोटी संघात आपली जागा बनवून होता. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे तो संघातून पुनरागमन करू शकला नाही. तो भारतीय कसोटी संघात यावा अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटू करत असतात. आता याच मुद्द्यावरून भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव व रवी शास्त्री आमने-सामने आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले होते की,
“हार्दिक पंड्या याचे शरीर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी योग्य नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून विश्वचषकानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात यावे.”
शास्त्री यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कपिल देव म्हणाले,
“शास्त्री यांच्या वक्तव्याचा मी आदर करतो. मात्र, मला असे वाटते की हार्दिकची इच्छा असेल तर तो नक्कीच कसोटी संघाचा भाग बनू शकतो. अनेक दुखापतींनी ग्रस्त असताना देखील डेनिस लिली यांनी आपली कारकीर्द मोठी केली होती. आता देखील वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवॉल हा एका वेगळ्या शरीरासह मैदानात येतो.”
हार्दिक मागील पाच वर्षापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. मात्र तो वनडे व टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने सप्टेंबर 2018 मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हार्दिकने 2017 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने 532 धावा व 17 बळी मिळवले होते. सध्या तो भारताच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोनदा आयपीएल अंतिम फेरीत धडक मारली होती.
(Kapil Dev And Ravi Shastri Speaks On Hardik Pandya Test Comeback)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’