आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आरसीबीचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आरसीबीचा प्रमुख खेळाडू एबी डिविलियर्सही भावुक झाला होता. विराट कोहली यावर्षी आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असल्यामुळे डिविलियर्सने विराटविषयी त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. विराट संघासाठी प्रेरणा आहे आणि त्याने कर्णधार किंवा फलंदाजाच्या रुपात केलेल्या प्रदर्शनापेक्षा त्याचे योगदान खूप जास्त असल्याचे डिविलियर्सने म्हटले आहे.
डिविलियर्सने आरसीबीने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याचे मत मांडले आहे. यावेळी तो विराटविषयी म्हणाला की, “जेव्हापासून विराट कर्णधार बनला आहे, तेव्हापासून मी त्याच्यासोबत संघात राहिलो आहे. मला वाटते की, त्याला पाहून जो शब्द डोक्यात येतो तो ‘आभारी’ असा आहे. आम्ही खूप नशीबवान होतो की, विराट आमच्यासोबत होता. ज्याप्रकारे विराटने या संघाचे नेतृत्व केले आहे, त्याने सर्वांना प्रेरित केले आहे. निश्चित रूपात त्याने मला एक खेळाडू आणि व्यक्तीच्या रूपात चांगले बनण्यासाठी प्रेरित केले आहे.”
डिविलियर्स पुढे म्हणाला की, “विराटला जेवढे वाटते, त्यापेक्षा संघावर खूप जास्त प्रभाव पडला आहे. संघ पहिल्यापेक्षा खूप पुढे गेला आहे. मी विराटला मैदानावर आणि मैदानाबाहेर दोन्ही रूपात ओळखतो. तो लोकांमध्ये आत्मविश्वास जागवतो. हे एक ट्रॉफी जिंकण्यापेक्षा खूप महत्वाचे आहे. तू खूप चांगले काम केले आहे, ही स्पर्धा अजून संपलेली नाही. तू आमच्यासाठी जे काही केले आहे, आम्ही त्याला विसरू शकत नाही. सर्व आठवणींसाठी धन्यवाद आणि मला वाटते की, काही पंचांना आता चांगली झोप येईल. त्यासाठी आनंदी आहे.”
दरम्यान केकेआरविरुद्धच्या सामन्यात विराट आणि पंचांमध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर एबी डिविलियर्सने पंचांवरही निशाणा साधल्याचे दिसत आहे. विराटने २०१३ पासून आरसीबीचे कर्णधारपद सांभाळले आहे आणि त्यानंतर विराटने संघाला चार वेळा प्लेऑफपर्यंत पोहोचवले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात २०१६ साली संघाने आयपीएलचा अंतिम सामनाही खेळला आहे. कोहलीने आतापर्यंत १४० सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले आहे आणि यापैकी ६६ सामने जिंकले आहेत.
कोहली पुढच्या वर्षी आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असून त्यानंतर एका खेळाडूच्या रूपात संघासोबत सामील होणार आहे. तसेच आगामी टी२० विश्वचषकानंतर तो भारताच्या टी-२० संघाचेही कर्णधारपद सोडणार आहे. विश्वचषकात भारत त्याचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट एकटा कर्णधार नाही, ‘हे’ भारतीय दिग्गजही त्यांच्या आयपीएल फ्रँचायझीला नाही बनवू शकले विजेता
टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडिया ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात