भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्म मध्ये आहे. कोहलीला जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातो. आजवर कोहलीच्या खात्यात ७० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. एकेकाळी कोहली आरामात सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडीत काढेल असे वाटत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावले नाही, त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, आता भारताचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी कोहलीची पाठराखण केली आहे.
रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) कोहलीची पाठराखण करत म्हणाले की, “विराट कोहली (Virat Kohli) सध्याच्या क्रिकेट विश्वात सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. एकेकाळी सुनील गावस्कर आणि विव रिचर्ड्स देखील खराब फॉर्ममधून गेले आहेत. त्यामुळे विराटच्या वाईट काळात आपण त्याला धीर द्यायला हवा. विराटने सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडीत काढावा ही माझी देखील वैयक्तिक इच्छा आहे.”
दिनेश लाड यांनी कोहली नंतर रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर देखील भाष्य केले. लाड म्हणाले की,”रोहित सध्या खराब फॉर्म मध्ये आहे याचा अर्थ तो खराब खेळाडू आहे असा अजिबात होत नाही. रोहितने विश्रांती घेत त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवणे हा योग्य निर्णय आहे. क्रिकेटमधील जबाबदाऱ्यांनी तयार झालेला दबाव कमी करण्यासाठी कुटुंबियांसोबत वेळ घालवणे गरजेचे असते. मला खात्री आहे रोहित लवकरच आपल्या पूर्व रुपात परतेल.”
दरम्यान, कोहलीने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये झळकावले. त्यानंतर आजवर त्याच्या कारकिर्दीत शतकांचा दुष्काळ पडला आहे. त्याला आणि त्याच्या चाहत्यांना कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची उत्कंठा लागून राहिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये सुद्धा कोहली विशेष चमक दाखवू शकलेला नाही. त्याला तीन सामन्यांत शून्य धावांवर बाद व्हावे लागले. अशातच आगामी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा फॉर्म परतेल अशी अपेक्षा केली जात आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तो वर्ल्डक्लास खेळाडू’, पराभवानंतरही विलियम्सनने गायले प्रतिस्पर्धी खेळाडूचे गोडवे
‘तर संघातील खेळाडू बदलावे लागतील’, कपिल देव यांनी रोहित, राहुल, विराटला सुनावले खडेबोल
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट