कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने सामने येतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर हा ऐतिहासिक सामना खेळवला जाईल. आता या सामन्यातील संभाव्य विजेत्याबाबत इंग्लंडच्या दोन माजी कर्णधारांनी अंदाज व्यक्त केला आहे.
वॉन आणि कूकने ‘या’ संघाला दिली पसंती
इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असणारा मायकल वॉन याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी कोणता संघ वरचढ ठरेल याविषयी भाकीत केले. वॉन म्हणाला, “माझ्यामते न्यूझीलंड या सामन्याचा विजेता असेल. संघाकडे दर्जेदार गोलंदाज व तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. तसेच, या संघाने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यात मिळून अप्रतिम खेळ दाखवला. तो एक उत्कृष्ट संघ आहे. याचाच फायदा त्यांना या महत्त्वाच्या सामन्यात होईल. ”
इंग्लंडसाठी १६२ कसोटी सामने खेळलेल्या दिग्गज सर ऍलिस्टर कूक याने वॉन याचीच री ओढली. कूक म्हणाला, “मला वाटते न्यूझीलंड हा सामना जिंकणार आहे. ते दबावात उत्कृष्ट खेळ दाखवतात. तसेच ते इंग्लंडमधील वातावरणात रुळले आहेत. त्यांचा संघ उत्कृष्ट असून, संघनिवड महत्त्वाची ठरेल. माझ्यामते, त्यांनी एजाज पटेलला संधी द्यायला हवी.”
फिरकीपटू एजाज पटेल हा आतापर्यंत एकदाही भारताविरुद्ध खेळला नाही. मिचेल सॅंटनर संघात नसल्याने त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी संभाव्य न्यूझीलंड संघ-
डेवॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलींग (यष्टीरक्षक), टिम साऊदी, कायले जेमिसन/मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, एजाज पटेल.
महत्वाच्या बातम्या:
न्यूझीलंड संघाचे तीन हुकमी एक्के, ज्यांच्यापासून भारताला अंतिम सामन्यात राहावे लागणार सावध
PSL: शान मसूदच्या खेळीने मुलतान सुलतान विजयी, तर क्वेटा ग्लॅडियेटरचे आव्हान संपुष्टात
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”