जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) मेगा लिलाव बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात जगभरातील अनेक खेळाडूंना मोठी बोली लावली गेली. इंग्लंडच्या खेळाडूंनाही या लिलावात मोठी रक्कम मिळाली. मात्र, आता जगप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक मिकी आर्थर (Micky Arthur) यांनी आयपीएलबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले आर्थर
क्रिकेट जगतातील मान्यवर प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे मिकी आर्थर सध्या डर्बीशायर काउंटी संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी इंग्लंड संघाच्या सध्याच्या खराब प्रदर्शनावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“ऍशेस मालिकेतील खराब प्रदर्शनासाठी काउंटी क्रिकेटला जबाबदार धरण्यात काही अर्थ नाही. या मालिकेत इंग्लंडने अधिक धावा काढल्या नव्हत्या. इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये यापुढे चांगले करायचे असेल तर प्रमुख खेळाडूंनी आयपीएल खेळणे बंद केले पाहिजे. तुम्हाला काउंटी क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू घेऊनच चांगला संघ बनवावा लागेल.”
इंग्लंड संघाला पत्करावा लागला पराभव
इंग्लंड संघाला ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असा विजय मिळविला होता. या पराभवाची जबाबदारी घेत संचालक ऍश्ले जाईल्स, मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड व फलंदाजी प्रशिक्षक यांनी राजीनामा दिला होता. तसेच संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनादेखील संघाबाहेर करण्यात आले.
आयपीएलमध्ये अनेक खेळाडू झाले करारबद्ध
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. तर जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो व मार्क वूड यांनाही कोट्यवधी रुपयांची बोली लागली. त्याचवेळी बेन स्टोक्स व जो रुट यांनी या आयपीएलमधून माघार घेतली होती. तर, जोस बटलर याला राजस्थान रॉयल्सने रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
टी२० मालिकेपूर्वी पोलार्डने व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाला… (mahasports.in)
IPL BREAKING| मुंबईकर श्रेयसकडे केकेआरची धुरा! आगामी हंगामात करणार कोलकाताचे नेतृत्व (mahasports.in)