गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या ‘सॅटर्डे स्पेशल’ लढतीत धक्कादायक बरोबरीची नोंद झाली. ६४व्या मिनिटाला केरला ब्लास्टर्सकडे २-१ अशी आघाडी असूनही जिगरबाज एटीके मोहन बागानने २-२ अशी बरोबरी साधली. जॉनी कौका याच्या रूपाने त्यांच्यासाठी देव धावून आला. त्याने अतिरिक्त (जादा) वेळेत अप्रतिम गोल करताना मोहन बागानला पराभवापासून रोखले. या एका गुणासह हैदराबाद एफसीला मागे टाकत एटीके मोहन बागानने अव्वल स्थानी झेप घेतली. त्यांच्या खात्यात १६ सामन्यांतून ३० गुण झालेत. विजयाची संधी हुकलेला केरला संघ १६ सामन्यांतून २७ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
टिळक मैदान स्टेडियमवर झालेल्या रंगतदार लढतीत दोन्ही सत्रात प्रत्येकी दोन गोल झाले. मध्यंतरीच्या १-१ अशा बरोबरीनंतर ६४व्या मिनिटाला कॅप्टन लुना याने लालथाथांगा खावलरिंगच्या मदतीने केरला ब्लास्टर्सला आघाडीवर नेले. पुढील २६ मिनिटे त्यांनी आघाडी राखली तरी खेळ संपायला काही सेंकद असताना प्रबीर दासला रेड कार्ड मिळाल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे जादा वेळेतील सहा मिनिटांत मोहन बागानला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्याचा फायदा केरला ब्लास्टर्सला उठवता आला नाही. दुसरीकडे, गाफील राहिलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा फायदा उठवत ह्युगो बॉमॉसने केरलाची बचावफळी भेदली. त्याच्या अचूक पासवर जॉनी कौका याने चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये धाडले आणि संघाला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली.
त्यापूर्वी, पहिले सत्र चुरशीचे झाले. मध्यंतराला १-१ अशी बरोबरी राहिली. दोन्ही गोल हे दोन मिनिटांच्या फरकाने नोंदवले गेले. आक्रमक पवित्रा घेत दोन्ही संघांनी झटपट चाली रचल्या. त्याचे फलस्वरूप सातव्याच मिनिटाला कर्णधार अड्रियन लुना याने केरला ब्लास्टर्सला आघाडीवर नेले. पाचव्या मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी चालून आली होती. सहल समद याने चेंडूवर ताबा घेत डाव्या बाजूने पेनल्टी एरियाच्या दिशेने कूच केली. यावेळी कार्ल मॅकह्युजने त्याला मागून ढकलून चेंडू मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी समदसह केरला क्लबला फ्री-किक बहाल करण्यात आली. मात्र, मोहन बागानच्या बचावफळीने चेंडू व्यवस्थित क्लियर केला.
मात्र, लवकर गोल करण्यासह आघाडी घेण्याचा केरलाचा आनंद जवळपास मिनिटभर टिकला. डेव्हिड विल्यम्सने प्रीतम कोटलच्या साथीने एटीकेला बरोबरी साधून दिली. प्रीतमने एक सुरेख चाल रचताना उजव्या बाजूने प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करण्यास सुरुवात केली. केरलाच्या आघाडी फळीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या लो क्रॉसवर विल्यम्सने चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले.
उर्वरित ३७ मिनिटे दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. चेंडू गोल जाळ्यात जाण्यापासून रोखण्यात लिस्टन कोलॅको आणि जॉर्ज डियाझ या दोन्ही गोलकीपरचे मोलाचे योगदान राहिले.
निकाल : केरला ब्लास्टर्स २(लुना-आठव्या आणि ६४व्या मिनिटाला, ) बरोबरी वि. एटीके मोहन बागान २(विल्यम्स-आठव्या मिनिटाला, जॉनी कौका-९०व्या मिनिटाला).
महत्त्वाच्या बातम्या-
खोटे वय दाखवल्याचा आरोप असलेल्या सीएसकेच्या खेळाडूवर बीसीसीआय नाही करणार कारवाई?, जाणून घ्या कारण
काय, असे कसे झाले?, रिषभ सामनावीर बनल्यानंतर कर्णधार रोहितची रिऍक्शन होती पाहण्यासारखी- VIDEO
प्रकरण चिघळलं! पाकिस्तान बोर्डावर धोखाधडीचा आरोप करणारा खेळाडू पीएसएलमधून बॅन, वाचा सविस्तर