ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत

भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीसाठी जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या विस्फोटक खेळीने जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला.

रोहितचा विक्रम
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात पाकिस्तान संघाच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 63 चेंडूत 86 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याच्या या खेळीत 6 चौकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहितने या सामन्यात मारलेल्या 6 षटकारांमुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

रोहित शर्मा एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय बनला. 2023 या चालू वर्षात रोहितच्या बॅटमधून तब्बल 47 षटकार निघाले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त षटकार मारण्याची डेरिंग कुठल्याच भारतीयाने केली नाहीये. सध्या विश्वचषक सुरू असून रोहितला आणखी बरेच सामने खेळायचे आहेत. अशात या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

रोहितव्यतिरिक्त एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर अव्वल 5 जणांच्या यादीत तिसरा क्रमांक सोडून सर्वत्र रोहितचेच नाव आहे. तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून त्याने 1998मध्ये 40 षटकार मारले होते. रोहितने 2017 साली 46 षटकार, 2018 साली 39 षटकार आणि 2019 साली 36 षटकार मारले होते. अशाप्रकारे त्याने सचिनसोबतच आपलेही विक्रम मोडीत काढले आहेत.

वर्षभरात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
47* – रोहित शर्मा, 2023*

46 – रोहित शर्मा, 2017
40 – सचिन तेंडुलकर, 1998
39 – रोहित शर्मा, 2018
36 – रोहित शर्मा, 2019

विश्वचषकात 1000 धावाही पूर्ण
विशेष म्हणजे, रोहित शर्मा याने वनडे विश्वचषकात 1000हून अधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्याने विश्वचषकात 20 सामने खेळताना 66.38च्या सरासरीने 1195 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून तब्बल 7 विक्रमी शतके निघाली आहेत. रोहितनंतर विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने 6 शतके केली होती. (Most ODI sixes by Indians in a year rohit four times did)

हेही वाचा-
गुरबाज बनला विक्रमवीर! वर्ल्डकपममध्ये इंग्लंडविरुद्ध केला ‘असा’ Record, लंकेच्या दिग्गजाचा विक्रम तुटला
‘हा तर फुसका बॉम्ब, मोठ्या पोरांनी…’, भारताच्या विजयानंतर सेहवागची लक्षवेधी पोस्ट

Related Articles