एमएस धोनी, याला सर्वोत्कृष्ट कर्णधार, परिपूर्ण यष्टीरक्षक आणि दमदार फलंदाज याबरोबर सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत त्याने आपली ही भूमिका चोखपणे पार पाडली आहे. रविवार रोजी (१० ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२१ चा पहिला क्वालिफायर सामना झाला. या सामन्यातही त्याने संघाला विजयी शेवट करुन दिला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी मोठ्या खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले होते. ऋतुराजने १९ व्या षटकांपर्यंत मैदानावर तग धरत ५० चेंडूंमध्ये ७० धावांची खेळी केली होती. तर उथप्पानेही ४४ चेंडूंचा सामना करताना ६३ धावा फलकावर लावल्या होत्या.
परंतु १९ व्या आणि २० व्या षटकात संघाला विजयी शेवट करून देण्याची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली होती. १८.१ षटकात ऋतुराजची विकेट गेल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी आला होता. याच षटकात त्याने एका षटकारासह मोईन अलीसोबत मिळून ११ धावा जमवल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या २० व्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती.
या निर्णायक षटकतील पहिल्याच चेंडूवर अष्टपैलू मोईन अली टॉम करनच्या जाळ्यात अडकला. पण षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट घेणाऱ्या टॉमला धोनीने सलग २ (दुसऱ्या व तिसऱ्या) चेंडूवर खणखणीत चौकार ठोकले. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर पुन्हा त्याच चेंडूवर त्याने चौकार खेचला आणि १९.४ षटकातच संघाचा विजय निश्चित केला. अशाप्रकारे एका वाईड चेंडूच्या धावेला पकडून त्याने या षटकात त्याने १३ धावा काढल्या आणि पुन्हा एकदा चेन्नई संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली.
धोनीने आयपीएलमध्ये २० षटकात १० किंवा त्यापेक्षा जास्त धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्याची ही विक्रमी सातवी वेळ होती. यापूर्वी त्याने अंतिम षटकात पंजाब किंग्जविरुद्ध (२०१०) १८ धावा, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (२०१३) १४ धावा, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (२०१४) १२ धावा, मुंबई इंडियन्सविरुद्ध (२०१४) १२ धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध (२०१४) ११ धावा आणि पंजाब किंग्जविरुद्ध (२०१६) २३ धावा करत सामने खिशात घातले होते.
धोनीव्यतिरिक्त चेन्नईचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो यांनीही संघासाठी ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे. जडेजाने २ वेळा तर ब्रावोने ४ वेळा अंतिम षटकात दुहेरी धावा फटकावत संघाला सामने जिंकून दिले आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्ड (४ वेळा), रोहित शर्मा (२ वेळा) आणि दिल्ली कॅपिटल्सच्या स्टिव्ह स्मिथनेही (२ वेळा) हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मॅचचं पारडं फिरवणाऱ्या राॅबिन उथप्पाचा श्रेयस अय्यरने सीमारेषेवर घेतला ‘सुपर कॅच’