मागील काही वर्षांपासून भारतीय संघाचे कर्णधारपद एमएस धोनी, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंनी सांभाळले आहे. सौरव गांगुली, धोनी आणि विराट यांना भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणले जाते.
एमएसके प्रसाद (MSK Prasad) भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता असतानाही धोनी (MS Dhoni) आणि विराट (Virat Kohli) यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच काहीवेळा विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले आहे. प्रसाद यांनी आपला कार्यकाळ नुकताच पूर्ण केला. प्रसाद यांनी धोनी, विराट आणि रोहितच्या नेतृत्व करण्याच्या पद्धतीबाबत खुलासा केला आहे.
धोनीने आपल्या नेतृत्वात भारताला २००७ चा टी२० विश्वचषक, २०११चा वनडे विश्वचषक आणि २०१३मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले आहे. सध्या विराट तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारताला आशिया चषक आणि निदाहास ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला आहे.
फॅनकोडला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी सांगितले की, “धोनी, विराट आणि रोहित या तिन्ही खेळाडूंची शैली वेगवेगळी आहे. धोनी मैदानावर शांत असतो. तर विराटला संघाकडून जे हवे असते, ते लगेच स्पष्ट करतो. तसेच रोहितचे नेतृत्वदेखील जवळ- जवळ धोनीसारखेच आहे. तोही खेळाडूंवर विश्वास ठेवतो.”
प्रसाद पुढे म्हणाले की, “धोनी शांत आहे. त्याच्या डोक्यात काय चाललंय हे तोपर्यंत समजत नाही, जेव्हापर्यंत परिणाम दिसत नाही. तर विराट प्रत्येक गोष्ट स्पष्ट करतो. तो नेहमी तुमच्या जवळ असतो.”
“रोहित एक वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहे. तो इतर खेळाडूंबरोबर सहानुभूतीने वागतो. तसेच तो खेळाडूंप्रमाणेच विचार करून ठरवतो की त्याला काय करायचे आहे,” असेही प्रसाद पुढे म्हणाले.
धोनीच्या भविष्याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले की, “तो आपल्या कारकीर्दीचा निर्णय स्वत: घेईल. मी माझी व्यावसायिक जबाबदारी बाजूला ठेवली तर, इतर व्यक्तींप्रमाणेच मीसुद्धा धोनीचा तितकाच मोठा चाहता आहे. धोनीने २ विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ जे धोनीने भारतीय संघासाठी मिळविले आहे, त्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकाच संघात एकाचवेळी खेळलेले टाॅप ५ स्पर्धक खेळाडू, जे आहेत चांगले मित्र
-डेविड वाॅर्नरचा साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स, या सुपरस्टारने मानले आभार
-पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मॅन ऑफ द सिरीज ठरलेले ३ भारतीय खेळाडू, एक आहे २० वर्षांचा