क्रिकेट आणि ग्लॅमर यांचे नाते क्रिकेटमध्ये नवे नाही. त्यातही गेल्या काही वर्षात लाईव्ह क्रिकेट सामने प्रदर्शित करण्याच्या बाबतील अनेक बदल झाले आहेत. जवळपास प्रत्येक सामन्यानंतर किंवा सामन्यापुर्वी बऱ्याच प्रकारचे शो होत असतात. त्यात अनेकदा सुंदर महिला अँकर असतात. अनेकदा या अँकरच्या प्रमात क्रिकेटपटू पडलेले आणि नंतर त्यांनी लग्न केलेलेही दिसले आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन.
नुकतेच सोमवारी (१५ मार्च) बुमराह आणि संजना हे दोघे लग्नबंधनात अडकले. बुमराह हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख गोलंदाज आहे. तर संजना ही क्रीडा निवेदिका (स्पोर्ट्स अँकर) असून तिने अनेक क्रिकेट सामन्यांदरम्यान अँकर म्हणून काम पाहिले होते. ती २०१९ विश्वचषकादरम्यानही अँकर म्हणून समोर आली होती.
विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह हा असा पहिला क्रिकेटपटू नाही, ज्याने स्पोर्ट्स अँकरसह लग्न केले आहे. यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स अँकरसह लग्नगाठ बांधली आहे. या लेखात आपण अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी स्पोर्ट्स अँकरबरोबर लग्न केले.
५. स्टुअर्ट बिन्नी-मयंती लँगर
भारतीय चाहत्यांसाठी मयंती लँगर हे नाव नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मयंती क्रिकेट सामन्यांदरम्यान आजी-माजी क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेताना दिसते. भारताचे सामने आणि मयंती लँगर हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले आहे. हीच मयंती लँगर भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. स्टुअर्ट बिन्नीची भारतीय संघाकडून खेळताना कारकिर्द फारशी खुलली नाही.
त्याने भारताकडून केवळ ६ कसोटी सामने, १४ वनडे सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १९४ धावा आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २३० धावा आणि २० विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ३५ धावा आणि १ विकेट घेतली आहे.
४. मॉर्ने मॉर्केल-रोज केली
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज मॉर्ने मॉर्केल साल २०१२ दरम्यान मुळच्या ऑस्ट्रेलियातील असलेल्या रोज केलीच्या प्रेमात पडला. पुढे २०१४ साली ते दोघेही विवाहबंधनात अडकले. रोज ही ऑस्ट्रेलियातील एक चॅनेलसाठी अँकर म्हणून काम करते. रोज आणि मॉर्ने यांना २ मुलेही आहेत.
मॉर्नेने २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ८६ कसोटी सामन्यात ३०९ विकेट्स, ११७ वनडे सामन्यात १८८ विकेट्स आणि ४४ टी२० सामन्यात ४७ विकेट्स घेतल्या आहेत.
३. बेन कटिंग- एरिन हॉलंड
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटिंगने मागील महिन्यातच पेशाने स्पोर्ट्स अँकर असलेल्या एरिन हॉलंडशी लग्न केले. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. तसेच त्यांनी २०१९ साली साखरपूडाही केला होता. एरिन ही केवळ स्पोर्ट्स अँकरच नाही तर एक प्रसिद्ध मॉडेलही आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या कटिंगने ४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ५३ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ४० धावा केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत आहेत. त्याला ऑस्ट्रेलियन संघातून जास्त सामने खेळण्याची संधी नाही मिळाली. परंतु त्याने टी२० लीग आपला जलवा दाखवला आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या २१ सामन्यात २१ च्या सरासरीने २३८ धावा केल्या आहेत. तसेच १० विकेट्स घेतल्या आहेत.
२. मार्टिन गप्टील-लॉरा मॅकगोल्डिक
मार्टिन गप्टिल हा न्यूझीलंडच्या संघातील नियमित सलामीवीर आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक सामने न्यूझीलंडला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्याने आत्तापर्यंत ४७ कसोटी, १८३ वनडे आणि ९९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात मिळून त्याने २१ शतकांसह १० हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पण आक्रमक फलंदाज म्हणून ओळख मिळवलेला गप्टीलला प्रेमाच्या पिचवर लॉरा मॅकगोल्डिकने बाद केले.
लॉरा मॅकगोल्डिक ही एक अँकर, रिपोर्टर आणि स्काय स्पोर्ट्स चॅनलची प्रसिद्ध रेडिओ जॉकी आहे. लॉराने ‘द क्रिकेट शो’, ‘होल्डन गोल्फ वर्ल्ड’, ‘एनझेड हेराल्ड फोकस’ यासारख्या अनेक मोठ्या कार्यक्रमांना होस्ट केले आहे. तसेच २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान लॉरा ही तिचा नवरा मार्टिन गप्टिलची मुलाखत घेण्यासाठी देखील गेली होती, दोघांचेही ते फोटो खूप व्हायरल झाले होते.
१. शेन वॉटसन-ली फरलाँग
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनने आत्तापर्यंत अनेकदा त्याच्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. पण हा धिप्पाड दिसणारा क्रिकेटपटू प्रेमात पडला तो ली फरलाँग या ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकरच्या. या दोघांनी २०१० साली लग्नगाठ बांधली. आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपात्य आहेत.
वॉटसनने मागीलवर्षीच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने क्रिकेट कारकिर्दीत ५९ कसोटी, १९० वनडे आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३७३१ धावा केल्या आहेत. वनडेत ५७५७ धावा केल्या आहेत, तर टी२० मध्ये त्याने १४६२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने एकूण २९१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘एप्रिल-मे महिन्यात मालदीव अप्रतिम असतं’; राजस्थान रॉयल्सकडून बुमराहला लग्नाच्या भन्नाट शुभेच्छा
ईशानच्या पदार्पणावेळी घरात होते ‘असे’ वातावरण; आई करत होती पुजा, तर वडील…
INDvENG: टी२० क्रिकेटमधील ‘या’ विक्रमांत आगेकूच करण्यासाठी विराट-रोहितमध्ये चढाओढ