आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्ज संघाचा आतापर्यंतचा प्रवास फारसा चांगला राहिला नाही. संघ गुणतालिकेत टॉप-५ मध्येही आपली जागा बनवू शकलेला नाही. मात्र आता पंजाब किंग्जला पाठिंबा देण्यासाठी, संघाची सहमालक प्रीती झिंटा यूएईमध्ये पोहोचली आहे. दुबईत झालेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी ती स्टेडियममध्ये उपस्थित होती. प्रीती झिंटाने स्वत: इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
प्रीती झिंटाने इन्स्टाग्राम पोस्टवर आपला फोटो शेअर केला आहे. यावर तिने लिहिले की, ‘मला अनेकदा वाटतं, जेव्हा तुम्ही अनेक वेळा क्वारंटाईनमधून जातात, तेव्हा या गोष्टी सोप्या होतील पण तसे नाही.’ तिचे शूट पुढे ढकलल्याबद्दल आनंद व्यक्त करत तिने लिहिले की, ‘आता मी दुबईमध्ये सामने पाहू शकते.’
प्रीतीने पंजाब किंग्ज संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. विशेष बाब अशी की, तिच्या या शुभेच्छा संघाच्या कामीही आल्या आहेत.
पंजाब किंग्ज संघाची सहमालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक हंगामात स्टेडियमवर पोहोचते. पंजाब किंग्स हा एक असा संघ आहे, ज्याने इतिहासात कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. याही हंगामात त्यांना जेतेपद हुलकावणी देऊ शकते.
https://www.instagram.com/p/CUPoWZusQJs/?utm_source=ig_web_button_share_sheet
असे असले तरीही, तिच्या उपस्थितीत पंजाब किंग्ज संघाने युएईतील आपले विजयाचे खाते उघडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झालेला हा संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयी ठरला आहे.
पंजाबचा ५ धावांनी विजय
प्रथम फलंदाजी करतांना पंजाबचा संघ २० षटकात केवळ १२५ धावा करू शकला. सलामीवीर मयांक अग्रवाल फक्त ५ धावा करून बाद झाला. तर लोकेश राहुल २१ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीरांना जेसन होल्डरने बाद केले. त्यानंतर वेगवान खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलने १७ चेंडूत फक्त १४ धावा केल्या. त्याला राशीद खानने चालते केले. एडन मार्करम ३२ चेंडूत २७ धावा केल्या. निकोलस पुरणने ८ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने एक षटकार लगावला.
त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केले. दीपक हुडाने १३ धावा केल्या तर नॅथन ऍलिस १२ चेंडूत १२ धावा केल्या. हरप्रीत ब्रारने १८ धावा आणि शमी शून्य धावावर नाबाद राहिले.
पंजाबच्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नरच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. पुढे कर्णधार केन विलियम्सननेही एका धावेवर विकेट गमावली. मधल्या फळीतील मनिष पांडे (१३ धावा) आणि केदार जाधव (१२ धावा) यांनीही खास खेळी करता आली नाही.
यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि जेसन होल्डर यांनी चिवट झुंज दिली. पण ३१ धावांवर खेळत असलेला साहा १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुर्दैवीरित्या धावबाद झाला. होल्डरने डावाखेर नाबाद ४७ धावांचे योगदान दिले. परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ७ धावांची गरज असताना तो मोठा फटका खेळू शकला नाही आणि पंजाबने सामन्यात बाजी मारली.
पंजाबकडून गोलंदाजी करताना युवा रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीनेही २ पलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. अर्शदीप सिंगनेही एका विकेटचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
SRHvPBKS: शेवटच्या क्षणी पंजाबची बाजी, ५ धावांनी हैदराबादला दिला धोबीपछाड
नादच नाय! हुड्डाचा पूर्ण ताकदनिशी फटका अन् हैदराबादच्या पठ्ठ्याचा हवेत उडत एकहाती ‘ब्लाइंडर कॅच’
रेकॉर्ड अलर्ट! फिरकीपटू अश्विनच्या टी२०तील २५० विकेट्स पूर्ण, आता फक्त ‘ते’ दोघे भारतीय पुढे