दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात तामिळनाडूने पुन्हा एकदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आपल्या नावे केली. अंतिम सामन्यात बडोद्याचा पराभव करून तामिळनाडूने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक ट्रॉफी जिंकली. अनेक युवा खेळाडूंनी तामिळनाडूच्या विजयात मोलाचे योगदान दिले. फलंदाज एन जगदीशनने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. अनुभवी कर्णधार दिनेश कार्तिक आणि अरुण कार्तिक यांनीही महत्त्वपूर्ण खेळ्या खेळल्या. मधल्या फळीतील फलंदाज शाहरुख खान आणि बाबा अपराजित यांनीही भरपूर योगदान दिले.
टी२० सामने जिंकण्यासाठी संघांकडे गोलंदाजी चांगली असायलाच हवी. तामिळनाडूकडे एक गोलंदाज असा होता जो विरोधी फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत डावखुरा फिरकीपटू आर. साईकिशोर याने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली व आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
साईकिशोरने केली किफायतशीर गोलंदाजी
साईकिशोरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळलेल्या ८ सामन्यांत ८ गडी बाद केले. पण त्याचा इकॉनॉमी रेट आश्चर्यकारक होता. साईकिशोरने प्रति षटकात केवळ ४.७२ धावा दिल्या. साईकिशोरने हिंमत दाखवून प्रत्येक वेळी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये फिरकीपटू म्हणून गोलंदाजी करण्याचे कठीण काम साईकिशोरने चोख पार पाडले.
टीएनपीएलमधून पुढे आला साई
अंतिम सामन्यात साईकिशोरला बडोद्याविरूद्ध एकही बळी मिळाला नाही परंतु त्याने ४ षटकांत केवळ ११ धावा दिल्या. साईकिशोरने केवळ याच स्पर्धेत शानदार गोलंदाजी केलेली नाही. हा डावखुरा गोलंदाज गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्व क्रिकेटतज्ञांवर प्रभाव पाडत आहे. साईकिशोर हा तामिळनाडू प्रीमियर लीगमधून पुढे आला होता, जिथे त्याने पहिल्या दोन हंगामात कोणत्याही फलंदाजास मुक्तपणे खेळू दिले नाही. पहिल्या हंगामात साईकिशोरने १२ आणि दुसर्या हंगामात १७ गडी बाद केले.
सीएसकेचा भाग आहे साईकिशोर
साईकिशोरची गुणवत्ता पाहून त्याला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२० साठी २० लक्ष रुपयात विकत घेतले. मात्र, कर्णधार धोनीने संपूर्ण मोसमात या डाव्या हाताच्या फिरकीपटूला एकही संधी दिली नाही. साईकिशोरने पुन्हा एकदा सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी दाखविली आहे, यावेळी धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएलमध्ये जर मला संधी मिळाली, तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन
टॉप ४ : भारतात पदार्पण केलेले इंग्लंडचे खेळाडू, ज्यांना पुढे दिग्गज म्हणून ओळखले गेले