आयपीएल 2023 मध्ये दुखापतींचे सत्र चांगलेच सुरू आहे. जवळपास दहा खेळाडू यापूर्वी स्पर्धेतून बाहेर झाले असताना, राजस्थान रॉयल्स संघालाही एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज व आक्रमक सलामीवीर जोस बटलर करंगळीच्या दुखापतीमुळे पुढील आठवडाभर मैदानापासून दूर राहू शकतो.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जोस बटलर हा कमीत कमी एक आठवडा आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या दुखापतीनंतर तो विश्रांती करेल. राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 8 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे सामना खेळणार आहे. या सामन्यात राजस्थानला बटलरच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. त्यानंतर राजस्थानचा पुढील सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होईल. या सामन्यातून बटलर पुनरागमन करू शकतो.
बटलर याला पंजाब किंग्सविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. झेल टिपताना त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झालेली. यामुळे तो सलामी ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. बटलरच्या जागी या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट आपले आयपीएल पदार्पण करू शकतो. अथवा दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक अष्टपैलू डोनोवन फरेरा याला देखील संधी मिळू शकते.
राजस्थान रॉयल्सने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 72 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केलेली. मात्र, पंजाब किंग्सविरुद्ध त्यांना दुसऱ्या सामन्यात पाच धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दिल्लीविरुद्ध पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
यशस्वी जयसवाल, जो रूट, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
(Rajasthan Royals Jos Buttler Set To Miss One Week IPL Action Due To Fingure Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB
डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ चेंडू गोलंदाजांचे सर्वात मोठे हत्यार, प्रशिक्षक ब्रावोची मोठी प्रतिक्रिया