मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये सामना खेळवला गेला. दोन्ही संघ यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने हा मुकाबला रंगतदार होण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. दोन्ही संघातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण देखील केल्या.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. विशेषतः रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत चाहत्यांची मने जिंकली. शेवटच्या षटकात त्याने मारलेल्या धावांनी त्याच्या नावे एक महत्त्वाचा विक्रमही नोंदवला गेला.
हर्षल पटेलला ठोकल्या तब्बल ३६ धावा
चेन्नईच्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिसने ७४ धावांची सलामी दिली होती. मात्र मधल्या षटकांत विकेट्स गमावल्याने चेन्नईचा डाव अडखळला होता. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. मात्र सेट झाल्यावर त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. विशेषतः डावाच्या शेवटच्या षटकांत त्याने हर्षल पटेलवर जोरदार हल्ला चढवला.
हर्षल पटेल यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्याने पर्पल कॅपचा मानकरी आहे. मात्र बंगलोरकडून २०वे षटक टाकायला आल्यावर जडेजाने त्याचा कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. जडेजाने या षटकांत तब्बल ३६ धावा काढल्या. यात ५ षटकार, १ चौकार आणि एका दुहेरी धावेचा समावेश होता. यासह आयपीएल इतिहासात एकाच षटकांत सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात जडेजाने अव्वल स्थान गाठले. यापूर्वी ख्रिस गेलने देखील एकाच षटकांत ३६ धावा काढण्याचा विक्रम केला होता.
आयपीएलमध्ये एकाच षटकांत सर्वाधिक धावा –
१) ख्रिस गेल – ३६ – वि. परमेश्वरन
२) रवींद्र जडेजा – ३६ – वि. हर्षल पटेल*
३) सुरेश रैना – ३२ – वि. परविंदर अवाना
जडेजाचे आक्रमक अर्धशतक
चेन्नईने पहिल्या डावात २० षटकांत ४ बाद १९१ धावा उभारल्या. यात जडेजाचे मोलाचे योगदान होते. त्याने २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. यात ५ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. त्यामुळेच चेन्नईला बंगलोर समोर विशाल धावसंख्येचे आव्हान ठेवणे शक्य झाले.
महत्वाच्या बातम्या:
आरसीबीविरूद्ध षटकार मारताच रैनाचे झाले हे आगळेवेगळे द्विशतक पूर्ण