भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चौथ्या टी२० सामन्याला सुरुवात झाली. हा सामना अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार सुरुवात देत अनोखी कामगिरी नोंदवली.
रोहितच्या नावे खास कामगिरी
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासाठी उपकर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. इंग्लंडसाठी लेगस्पिनर आदिल रशीद प्रथम गोलंदाजीसाठी आला. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने लाँग ऑफला षटकार ठोकत स्वतःचे व संघाचे खाते खोलले. याचबरोबर, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.
रोहितचे भारतात ५० षटकार
याबरोबरच हा षटकार रोहितचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील भारतात मारलेला ५० वा षटकार ठरला. त्यामुळे भारतात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० षटकार ठोकणाराही तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली असून विराटने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४८ षटकार भारतात मारले आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ३२ षटकारांसह युवराज सिंग आहे.
भारताची समाधानकारक सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने समाधानकारक सुरुवात केली. रोहित शर्मा चौथ्या षटकात १२ चेंडूमध्ये १२ धावा काढून जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहलीने आपला दुसरा सामना खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. त्यानेही पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
केएल राहुलचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. त्याने, १४ धावा बनविल्या. पण वरची फळी अपयशी ठरल्यानंतर सुर्यकुमारने जबाबदारी स्विकारत अर्धशतक पूर्ण केले. तो ५७ धावा करुन बाद झाला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारतीय संघाने १६ षटकात ४ बाद १४० धावा काढल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅनचा विक्रम! १२ धावांवर बाद होऊनही रोहितने टी२० क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ मोठा टप्पा
बाबर आझम पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला धक्का
इंग्लिश गोलंदाजांनी ओळखली आहे हार्दिकची ‘ही’ उणीव, माजी दिग्गजाची टिप्पणी