अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असून या सामन्यादरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यादरम्यान रोहितने ११ वी धाव काढताच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ९ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात हा टप्पा पार करणारा तो दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, तर जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे.
रोहितपूर्वी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मिळवला होता. विराटने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३०३ सामन्यात ९६५१ धावा केल्या आहेत. तसेच सध्या रोहितच्या नावावर ३४२ ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ६ शतके आणि ६३ अर्धशतकांसह ९००१ धावा आहेत.
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये(सर्व प्रकारच्या २० षटकांच्या सामन्यात ) सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१३७२० धावा – ख्रिस गेल (४१६ सामने)
१०६२९ धावा – किरॉन पोलार्ड (५३४ सामने)
१०४८८ धावा – शोएब मलिक (४१७ सामने)
९९२२ धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (३७० सामने)
९८२४ धावा – डेव्हिड वॉर्नर (२९८ सामने)
९७१८ धावा – ऍरॉन फिंच (३१९ सामने)
९६५१ धावा – विराट कोहली (३०३ सामने)
९१११ धावा – एबी डिविलियर्स (३२५ सामने)
९००१ धावा – रोहित शर्मा (३४२ सामने)
चांगल्या सुरुवातीनंतर रोहित स्वस्तात बाद
रोहितने चौथ्या टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत शानदार सुरुवात केली होती. मात्र सामन्याच्या चौथ्या षटकात तो जोफ्रा आर्चरविरुद्ध खेळताना बाद झाला. आर्चरने स्वत:च्याच गोलंदाजीवर रोहितचा झेल घेतला. त्यामुळे तो १२ चेंडूत १२ धावा करुन बाद झाला.
हा सामना भारतीय संघासाठी ‘करो वा मरो’ अशा स्थितीतील सामना आहे. कारण पहिल्या तीन सामन्यांनंतर इंग्लंड २ विजयांसह २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताला मालिकेतील आव्हान जिंवत ठेवावे लागेल. तर इंग्लंड या सामन्यात विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझम पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला धक्का
इंग्लिश गोलंदाजांनी ओळखली आहे हार्दिकची ‘ही’ उणीव, माजी दिग्गजाची टिप्पणी
टीम इंडियाचं वेळापत्रक गजबजलं! ऑक्टोबर महिन्यात मायदेशात होणार दोन टी२० मालिका