लालमातीत भल्याभल्या दिग्गज कुस्तीपटूंना आस्मान दाखवणारे महाराष्ट्रीयन मल्ल श्रीपती खंचनाळे यांचे सोमवारी (१४ डिसेंबर) निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारतीय कुस्ती क्षेत्रातील पहिले हिंद केसरी खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. खंचनाळे यांच्या मृत्यूमुळे कोल्हापुरसह पूर्ण कुस्ती क्षेत्र शोकसागरात आहे.
श्रीपती खंचनाळे यांची नोव्हेंबर महिन्यात प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना कोल्हापुरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती अजून जास्त नाजूक झाल्यामुळे त्यांना कोल्हापूरमधील महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. अखेर तिथे सोमवारी उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुले, विवाहित मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
श्रीपती खंचनाळे यांच्याविषयी थोडेसे…
श्रीपती शंकर खंचनाळे यांचा जन्म दिनांक १० डिसेंबर १९३४ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला होता. मराठी माध्यमातून त्यांनी त्यावेळी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. कृष्णा नदीकाठच्या ज्या गावात खंचनाळे यांचा जन्म झाला ते दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे गावातील मुले मुळातच शरीराने धडधाकट आणि कणखर होती. श्रीपती खंचनाळे यांनी पुढे जाऊन मोठे कुस्तीपटू होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे अशा गावात अर्थात याकसंभा, चिक्कोडी या बेळगाव जिल्ह्यात त्यांचे गेलेले बालपण.
सन १९५० पासून खंचनाळे यांनी कुस्तीला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली होती. त्यांचे आदर्श असणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे ते या क्षेत्रात आले अशा असंख्य मल्लांबरोबर त्यांनी कुस्ती खेळली. चपळता, वेग, ताकद या कुस्तीसाठी अतिशय महत्वाच्या गोष्टी. खंचनाळे या गोष्टी आत्मसात करण्यासाठी त्यावेळी ३ वाजता उठत असत. तब्बल ३००० बैठका, ३००० जोर, अर्धा तास माती खणणे हे झाल्यावर मल्लखांब अशा गोष्टी ते करत असत.
सन १९५९ मध्ये त्यांनी त्यावेळचा पंजाब केसरी असलेल्या बनाता सिंगवर मात करून हिंद केसरी हा किताब मिळवला होता. त्याच वर्षी त्यांनी आनंद शिरगावकर यांना कऱ्हाड येथे २ मिनिटात पराभूत करून मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. १९५८ (बेळगाव), १९६२ (जबलपूर) आणि १९६५ (बंगळुरू) या ठिकाणी झालेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या. त्यात त्यांनी पंजाब, बंगाल आणि भारतीय आर्मीच्या तगड्या मल्लांना धूळ चारली होती. त्यावेळी पंजाब आणि पाकिस्तान प्रांतातील मल्लांचा एक दरारा होता. अशा कालखंडात खंचनाळे यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली होती.
एवढेच नव्हे, तर खंचनाळे यांना त्यांच्या कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न, एकलव्य पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे…
आजपर्यंतचे महाराष्ट्रीयन हिंद केसरी…!!
लाल मातीतील पठ्ठ्या बनला फौजदार! पैलवान राहुल आवारे पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पदी