भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता संपला असून, आता टीम इंडिया दीर्घ विश्रांतीवर जात आहे. भारतीय संघ आता थेट 19 सप्टेंबरपासून ऍक्शनमध्ये दिसणार आहे. भारतीय संघाचे बहुतांश खेळाडू ब्रेकवर असताना, भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये घाम गाळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादवला भारताकडून कसोटीत संधी मिळाली नसून, त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघात संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन आता सूर्यकुमार यादव बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार या स्पर्धेत मुंबई क्रिकेट असोसिएशन इलेव्हन संघाकडून, तमिळनाडू इलेव्हनविरुद्ध खेळताना दिसेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार हा भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे तो उपलब्ध असेल तेव्हा मुंबई क्रिकेट संघासाठी खेळेल. बुची बाबू स्पर्धेसह केएससीए गोल्ड कपदेखील खेळेल.
बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व सर्फराज खान करेल. संघाचा नियमित कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असल्याने सर्फराज कर्णधारपद सांभाळेल. सूर्यकुमारने यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे की, तो सर्फराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार आहे.
मुंबई संघाने यावर्षी अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती. त्या संघातील कर्णधार रहाणे व पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये खेळत आहेत. तर, श्रेयस अय्यर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे. बुची बाबू स्पर्धेत मुंबई संघासाठी सर्फराज व सूर्यकुमार व्यतिरिक्त शम्स मुलाणी, मोहित अवस्थी, प्रफुल्ल वाघेला व तुषार देशपांडे हे प्रमुख खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बुची बाबू स्पर्धा ही तामिळनाडूतील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू सहभागी झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का