सध्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आफ्रिका क्षेत्रातील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत रोज नवे नवीन विक्रम नोंदवले जात आहेत. तर मोठे विक्रम मोडलेही जात आहेत. असाच काहीसा विक्रम शनिवारी (११ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे. या सामन्यात तंजानिया संघाने मोंजाबिक संघाला तब्बल २०० धावांनी पराभूत केले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या तंजानिया संघाने मोंजाबिक संघातील गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी अवघ्या २० षटकात २२८ धावा फलकावर लावल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना तंजानिया संघातील गोलंदाजांनी मोंजाबिक संघातील फलंदाजांना दुहेरी अंक देखील गाठू दिला नाही. परिणामी मोजांबिक संघ अवघ्या २८ धावांवर सर्वबाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या तंजानिया संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. डावातील तिसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या २२ असताना तंजानिया संघातील पहिला गडी बाद झाला होता. यानंतर ६ व्या षटकात तंजानिया संघाला दुसरा धक्का बसला होता.
किबासू आणि स्वेडी यांची शतकी भागीदारी
यानंतर फातुमा किबासू आणि स्वेडी या दोघांनी मिळवून तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. या दोघींनी तिसऱ्या गडीसाठी १०० धावांची भागीदारी केली. परंतु डावातील १४ व्या षटकात किबासू ६२ धावा करत माघारी परतली होती. आपल्या खेळीदरम्यान तिने १० चौकार मारले होते. या दोघींनी १०७ धावांची भागीदारी केली.
स्वेडीची नाबाद ८७ धावांची खेळी
किबासू बाद झाल्यानंतर स्वेडीने एकहाती किल्ला लढवत आक्रमण सुरू ठेवले होते. तिला नीमा पियुसची साथ मिळाल्यानंतर दोघांनी मिळून मोंजाबिकच्या गोलंदाजांना चोप देत संघाच्या एकूण धावा २०० च्या पार पोहचवल्या. २० षटक अखेर तंजानिया संघाला ४ गडी बाद २२८ धावा करण्यास यश आले होते. डावाखेर स्वेडी ८७ धावांवर नाबाद राहिली.
मोजांबिकचा पूर्ण संघ केवळ २८ धावांवर गारद
मोंजाबिक संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावांची आवश्यकता होती. दरम्यान तंजानिया संघातील गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच मोंजाबिक संघातील फलंदाजांना बॅकफूटवर ठेवले होते. मोंजाबिक संघाने ७ धावांवर असताना आपला पहिला गडी गमावला. त्यानंतर मोंजाबिक संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोंजाबिक संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाही. १२.५ षटकात मोंजाबिक संघातील ९ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. तर एक फलंदाज,फलंदाजी करण्यासाठी मैदानात आली नाही. हा सामना तंजानिया संघाने २०० धावांनी आपल्या नावावर केला. (Tanzania beat Mozambique by 200 runs)
महिला टी२० क्रिकेट इतिहासातील पाचवा सर्वात मोठा पराभव
महिला टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हा ५ वा सर्वात मोठा पराभव आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी पराभूत होण्याचा विक्रम माली संघाच्या नावावर आहे. २०१९ मध्ये युगांडा संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात माली संघाला ३०४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर दुसरा सर्वात मोठा पराभवही माली संघाच्याच नावे असून तंजानिया संघाने माली संघाला २६८ धावांनी पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधून माघार घेतलेल्या मलान अन् बेयरस्टोच्या जागी ‘या’ खेळाडूंना संधी, एकटा MI चा जुना शिलेदार
अंतिम कसोटी सामना रद्द झाल्यानंतर ईसीबीचे आयसीसीला पत्र, जाणून घ्या काय लिहिले होते त्यात