काल (2 मार्च) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने 7 विकेट्सने गमावला. या पराभवानंतर न्यूझीलंडकडून 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश स्विकारावा लागला आहे. असे असले तरी, भारतीय संघाने आज (3 मार्च) जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.
भारत 116 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकाविजयानंतर दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड भारतापेक्षा या क्रमवारीत 6 गुणांने मागे आहे. तसेच, 108 गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 4 डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केवळ 38 धावा केल्या आहेत. तरीही आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्याच्या गुणांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
विराट 906 गुणांवरुन 886 गुणांवर आला आहे. त्यामुळे त्याच्यातील आणि अव्वल क्रमांकावर असलेल्या स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर वाढले आहे. स्मिथ आता विराटपेक्षा 25 गुणांनी पुढे आहे.
या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम ब्लंडेल, भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू काईल जेमीसन यांना मोठा फायदा झाला आहे.
ब्लंडेलने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत 4 डावात एका अर्धशतकासह 117 धावा केल्या आहेत. तो फलंदाजांच्या क्रमवारीत 27 स्थानांची झेप घेत 46व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, याच मालिकेत 54 धावांची खेळी करणारा शॉ 17 स्थानांची प्रगती करत 76व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मात्र एका स्थानाचे नुकसान झेलावे लागले आहे. तो सध्या 813 गुण मिळवत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशानने विलियम्सनची जागा घेत तिसरा क्रमांक (827) पटकावला आहे.
तसेच मयंक अगरवाल 10व्या स्थानावरून 11व्या स्थानावर घसरला आहे. चेतेश्वर पुजारा (766) 7व्या तर अजिंक्य रहाणे (726) 9व्या क्रमांकावर आहे.
Virat Kohli maintained his second spot, while Kane Williamson slipped one position in the @MRFWorldwide ICC Test Rankings for batsmen after the #NZvIND series.
➡️ https://t.co/prAx9uffmC pic.twitter.com/YJRok7JJWn
— ICC (@ICC) March 3, 2020
या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारा न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साउथी गोलंदाजांच्या क्रमवारीत 2 स्थानांची प्रगती करत चौथा क्रमांक मिळवला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 4 स्थानांची प्रगती केली आहे. ते अनुक्रमे 7व्या आणि 9व्या क्रमांकावर आहेत. मात्र, गोलंदाजी क्रमवारीत जेमीसनला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने 43 स्थानांची ऊंच उडी घेत 80वे स्थान काबीज केेले आहे.
जेमिसन अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत 26 स्थानांनी पुढे जात 22व्या क्रमांकावर आला आहे. तर, या क्रमवारीत भारताचे रविंद्र जडेजा तिसऱ्या आणि आर अश्विन पाचव्या क्रमांकावर कायम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया नक्कीच वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचेल, या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा विश्वास
–कपिल देव म्हणतात, विराटच्या खराब फॉर्मसाठी ही गोष्ट जबाबदार
–या तीन मोठ्या खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन