आयपीएल २०२२ मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची हालत खराब झाली. पहिल्या आठ सामन्याला तर विजयाचा नारळ फुटला नाही आणि त्यांच्यावर टूर्नामेंटमधून बाहेर होणारा पहिला संघ व्हायची नामुष्की आली. अखेर नवव्या सामन्याला त्यांना जिंकण्यात यश आलं. त्याच्या पुढचा सामना पण जिंकत त्यांनी विजयाचा ट्रॅक धरला. जेव्हापासून मुंबई या विजयी ट्रॅकवर आली तेव्हापासून मात्र एकाच प्लेअरची चर्चा सुरू झाली, नाव टीम डेव्हिड.
टीम डेव्हिडची चर्चा व्हायचं कारण म्हणजे त्यान मुंबईने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मॅचविनिंग खेळी खेळल्या. आधी राजस्थानविरुद्ध ९ चेंडू २० धावा करून त्याने सामना संपवला आणि टेबल टॉपर गुजरातला १७८ चे आव्हान देताना २१ चेंडूत ४४ ची नाबद खेळी खेळली. अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारले, अरे हा एवढा भारी खेळतो तर, याला दोन सामन्यांंनंतर बसवलं का?. खरं तर या प्रश्नच उत्तर येणे अवघड दिसतेय. कारण मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान आणि केकेआरशी ऑक्शन वॉर करत सव्वा आठ कोटीला घेतलेल्या डेव्हिडला जास्त चान्स देणे तर बनतेच.
खरंतर ऑक्शनमध्ये टीम डेव्हिडवर इतकी मोठी बोली पाहून क्रिकेटप्रेमींचे डोळे विस्फारले. मात्र अनेकांना याचा अंदाज आधीच आलेला. कारण ऑक्शनच्या दरम्यान पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग सुरू होती आणि संघ तिथं रनांचा अक्षरशः पाऊस पडत होता. तो झाला करंट फॉर्म. पण त्याच्या दोन-तीन वर्षापासून तो असाच खेळतोय. बिग बॅश, कॅरिबियन प्रीमियर लीग, हंड्रेड, टी१० जिथे जावं तिथं त्याच्या बॅटिंगचा जलवाच राहिला. एवढेच काय आरसीबीनेही त्याला गेल्यावर्षी संघात घेतलं खरं, पण एकच मॅच खेळवली.
या टीम डेव्हिडची कहानी देखील एकदम भारी आहे बर का!. म्हणजे कसं क्रिकेटच्या नकाशावर कुठेच नसलेल्या सिंगापूरचा त्याचा जन्म. खरंतर त्यांचं मूळ ऑस्ट्रेलियात. थोडक्यात तो ऑस्ट्रेलियनच. त्याचे वडील १९९० च्या आसपास सिंगापूरमध्ये इंजिनियर म्हणून कामाला आले. तिथेच राहिले आणि १९९६ ला टीमचा जन्म झाला. त्याचे वडील रॉड हे पण क्रिकेटरच. ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या रॉड यांनी १९९७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी सिंगापुरसाठी खेळलीय. त्यामुळे क्रिकेटसाठी दुसरीकडे कुठेतरी इन्स्पिरेशन शोधायची टीमला गरजच पडली नाही.
१९९९ ला सिंगापूरमध्ये आर्थिक मंदी आल्याने रॉड पुन्हा मायदेशी परतले. रॉड क्रिकेट खेळतच होते. अशात आठव्या वर्षी टीमही खेळल तर फक्त क्रिकेटच खेळायचा म्हणून अडून बसला. रॉडच त्याचे कोच बनले. त्याची फलंदाजी लहानपणापासूनच कमाल होत होती. थोडा वयात येताच त्याचं नाव ऑस्ट्रेलियाच्या अंडर नाईन्टीन सर्किटमध्ये गाजू लागल. त्याने इंग्लंडमध्ये जाऊन नॉर्थ ईस्ट चॅम्पियनशिपमध्ये ९०० धावांचा हंगामही केला. पुढे २०१८ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि बिग बॅशच्या पर्थ स्कॉर्चेर्सने त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं. इथं नशिबाने थोडा धोका दिला आणि त्याला दुखापत झाली. बिग बॅश खेळता आली नाही आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी फॉर्म दिसला नाही.
पुढे दोघांनी कॉन्ट्रॅक्ट वाढवली नाहीत. आता खेळायचं कुठे म्हणून त्यान सरळ आपला जन्म जिथे झाला त्या सिंगापूरची वाट धरली. त्याला डायरेक्ट २०१९ वर्ल्डकप क्वालिफायर्स खेळायला मिळाले. केवळ दोन वर्षाचा असताना सिंगापूर सोडलेल्या टीमच सिंगापूरशी नातं इतकंच होतं की, तो दरवर्षी एकदा सुट्ट्या घालवायला सिंगापूरला यायचा.
आज आयपीएलमधून त्याला नवी ओळख मिळत असली तरी, त्याचं करिअर खऱ्या अर्थाने घडलं ते म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या टी२० लीगमूळेच. साडेसहा फुटाची उंची आणि तगडी शरीरयष्टी असलेला टीम डेव्हिड खरंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटच भविष्य आहे. कारण आयसीसीच्या नियमानुसार तो कधीही ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकतो. स्वतः ऑसी कॅप्टन ऍरॉन फिंचने तो पुढच्या टी२० वर्ल्डकपला ऑस्ट्रेलियासाठी खेळणार असल्याचे संकेत दिलेत. ऑस्ट्रेलियाला आपला वर्ल्डकप राखायचा असल्यास टीम डेव्हिड त्याचा ‘मेन मॅन’ ठरू शकतो.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार स्टडेड कोची टस्कर्स एकाच सीझननंतर आयपीएलमधून बाहेर का झाली?
कोट्यवधी मने जिंकणाऱ्या धोनीचेच ‘या’ आर्टिस्टने जिंकले मन, चित्र पाहण्यासाठी स्वत: गेला माही
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी