मोहाली। शुक्रवारपासून (४ मार्च) भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. हा त्याचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. त्यातच त्याला हा सामना आणखी खास करण्याची संधी असणार आहे. तो सामन्यात काही विक्रम करू शकतो.
विराट करणार मोठे विक्रम
विराटने त्याच्या १०० व्या कसोटीत (100th Test) ३८ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा (8000 Test Runs) पूर्ण करू शकतो. असा कारनामा करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांनी असा कारनामा केला आहे.
याशिवाय विराटने जर त्याच्या १०० व्या कसोटीत ८००० धावांचा टप्पा ओलांडला, तर तो सर्वात जलद ८००० कसोटी धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये चौथा क्रिकेटपटू ठरेल.
या यादीत अव्वल क्रमांकावर सध्या सचिन तेंडुलकर आहे. सचिनने १५४ कसोटी डावात ८००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल द्रविडने १५८ डावात आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विरेंद्र सेहवागने १६० डावात ८००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने आत्तापर्यंत ९९ कसोटीत १६८ डावात ५०.३९ च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत.
याशिवाय विराटने जर या सामन्यात शतक केले, तर ते त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक असेल. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगची बरोबरी करेल. पाँटिंगनेही ७१ शतके केली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतके आहेत.
एवढेच नाही, तर विराटने जर या सामन्यात शतक केले, तर तो कारकिर्दीतील १०० व्या कसोटीत शतक करणारा १० वा फलंदाज ठरेल. यापूर्वी असा कारनामा ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला, कॉलिन कॉवड्रे, ऍलेक स्टिवर्ट, जो रूट, गोर्डन ग्रिनिज, रिकी पाँटिंग, जावेद मियाँदाद आणि इंजमाम उल हक या क्रिकेटपटूंनी केला आहे.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५९२१ धावा – सचिन तेंडुलकर (२०० सामने)
१३२६५ धावा – राहुल द्रविड (१६३ सामने)
१०१२२ धावा – सुनील गावसकर (१२५ सामने)
८७८१ धावा – व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ सामने)
८५०३ धावा – विरेंद्र सेहवाग (१०३ सामने)
७९६२ धावा – विराट कोहली (९९ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
‘पचनाची गोळी, सणांत होळी आणि फलंदाजीत कोहली’, सेहवागकडून १०० कसोटी खेळणाऱ्या विराटचे कौतुक
आयएसएल: मुंबई सिटी एफसीचे आव्हान संपल्यात जमा, केरला ब्लास्टर्सचा दणदणीत विजय