भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत फारशा धावा करू शकलेला नाही. त्यामुळे सध्या त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत कोहलीवर मुंबई कसोटीत चांगली कामगिरी करण्याचं दडपण असेल. कारण या मालिकेपूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटींमध्येही कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतील विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं दोन सामन्यांच्या चार डावात केवळ 88 धावा केल्या, ज्यामध्ये 70 धावांच्या खेळीचा समावेश आहे. कोहलीनं बंगळुरू कसोटीत मालिकेतील एकमेव अर्धशतक झळकावलं होतं. तर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं चार डावांत केवळ 99 धावा केल्या होत्या. चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. मात्र, आता ही प्रतीक्षा मुंबईत संपू येऊ शकते, कारण कोहलीचा वानखेडे स्टेडियमवर कसोटीतील रेकॉर्ड खूपच चांगला आहे.
विराट कोहलीनं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाच कसोटी सामने खेळले असून या मैदानावरील त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यानं येथे 58.62 च्या सरासरीनं 469 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. कोहलीनं डिसेंबर 2016 मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट द्विशतक झळकावलं होते. त्यानं 340 चेंडूत 235 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीत 25 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. कोहलीनं या मैदानावर 43 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत.
विराट कोहलीनं या मैदानावर शेवटची कसोटी न्यूझीलंडविरुद्धच खेळली होती. 2021 मध्ये झालेल्या त्या सामन्यात कोहलीला पहिल्या डावात खातं उघडता आलं नव्हतं, तर दुसऱ्या डावात त्यानं 36 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
“त्यांनी कराराच्या अटींचे उल्लंघन…”, गॅरी कर्स्टनच्या राजीनाम्यावर पीसीबी प्रमुखांचे मोठे वक्तव्य
टीम इंडियात फूट? रोहित-गंभीरमध्ये वाद? मालिका पराभवानंतर संघात गटबाजी
19 वर्षांपूर्वी बनला होता विश्वविक्रम! लांब केसांच्या ‘माही’नं आजच्याच दिवशी खेळली होती कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी