2024 टी20 विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. डल्लास येथील ग्रँड पेयरी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं 125 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे बांगलादेशनं 6 चेंडू राखून गाठलं. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव होऊनही संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हसरंगा हा श्रीलंकेसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. सध्या त्याच्या नावे टी20 मध्ये 108 विकेट्स आहेत. त्यानं केवळ 67 टी20 सामन्यांमध्ये इतक्या विकेट घेतल्या. हसरंगानं श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. मलिंगानं आपल्या कारकिर्दीत 84 टी20 सामन्यांमध्ये 107 बळी घेतले आहेत. हसरंगा आणि मलिंगा व्यतिरिक्त श्रीलंकेचा एकही गोलंदाज 100 बळींचा आकडा गाठू शकलेला नाही. मलिंगानं त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2020 मध्ये खेळला होता. तर हसरंगानं 2019 मध्ये या फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं.
श्रीलंकेसाठी टी20 मध्ये सर्वाधिक बळी
वानिंदू हसरंगा – 108
लसिथ मलिंगा – 107
नुवान कुलसेकरा – 66
अजंता मेंडिस – 66
दुष्मंथ चमीरा – 55
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सौम्या सरकार खातही उघडू शकला नाही. तर तनजी हसनला केवळ 3 धावा करता आल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो (7) स्वस्तात तंबूत परतला. यानंतर तौहीद आणि लिटन यांनी चौथ्या विकेटसाठी 63 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सावरलं. महमुदुल्लाह 16 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकानं 47 धावांची खेळी केली. डी सिल्वानं 21 आणि चराथी असलंकानं 19 धावांचे योगदान दिलं.
‘ड’ गटात श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता. या पराभवानंतर श्रीलंकेच्या सुपर-8 मध्ये पोहचण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा नेट्समध्ये सरावादरम्यान जखमी! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार का?
टी20 विश्वचषकात पाहायला मिळाला आणखी एक लो स्कोअरिंग सामना! बांगलादेशचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका