येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी पाहता त्यांना विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु न्यूझीलंड संघानेही मागील काही काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंका नाही. तत्पूर्वी विस्डेनने या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. यामध्ये दिग्गज गोलंदाजाला स्थान देण्यात आले नाही.
या सामन्यासाठी विस्डेनने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांना सलामी फलंदाज म्हणून संधी दिली आहे. गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पणाच्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु मायदेशात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत तो फ्लॉप ठरला होता. तरीदेखील विस्डेनने त्याला या संघात स्थान दिले आहे.
यासोबतच त्यांनी या संघात दोन फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाजांना जागा दिली आहे. मुख्य बाब म्हणजे या संघात अनुभवी गोलंदाज ईशांत शर्माला स्थान देण्यात आले नाहीये. यासोबतच अनेक असे युवा खेळाडू आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनाही या संघात सहभागी केले गेले नाही.
या संघात तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात आले आहे; तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सहाव्या क्रमांकावर युवा यष्टिरक्षक रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. पंतने मागील काही वर्षांत भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विस्डेनच्या प्लेइंग ११ मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना स्थान देण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून ईशांत शर्माला संधी न देता, मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना देखील या संघात स्थान देण्यात आले आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी विस्डेनने निवडलेली प्लेइंग ११
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर
शानदार कारकिर्द अन् क्रिकेटची उत्तम जाण असूनही गावसकर प्रशिक्षकपदापासून दूर? वाचा कारण
ENG vs NZ : न्यूझीलंडच्या अथक प्रयत्नांनंतरही इंग्लंडला पहिला कसोटी अनिर्णित राखण्यात यश