India vs New Zealand Semifinal 2023: भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताशिवाय कुठल्याच संघाला या स्पर्धेत नऊच्या नऊ सामने जिंकण्यात यश आले नाहीये. अशात रोहित शर्मा याची ही दमदार सेना बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यावरून कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना 2019 विश्वचषक उपांत्य सामनाही आठवला असेल. अशात, भारतीय चाहत्यांना आशा आहे की, रोहितसेना 4 वर्षांपूर्वी मिळालेल्या या पराभवाचा वचपा नक्की काढेल. मात्र, अशातच न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार रॉस टेलर याने मोठे विघान केले आहे.
काय म्हणाला टेलर?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्याविषयी रॉस टेलर (Ross Taylor) याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मत मांडले आहे. त्याला विश्वास आहे की, चालू विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सामना करताना भारत चिंतीत होईल. न्यूझीलंडने 4 वर्षांपूर्वी विश्वचषक 2019 (World Cup 2019 Semi Final) स्पर्धेतही भारताचा दबदबा संपवत पावसामुळे प्रभावित झालेल्या उपांत्य सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभूत केले होते.
मॅनचेस्टर येथे पार पडलेल्या 2019 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात रॉस टेलर न्यूझीलंड संघाचा भाग होता. तो म्हणाला, “न्यूझीलंड आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात भारताशी भिडण्यासाठी तयारी करत आहे. अशात 2019ची तुलना याच्याशी केली जाणार नाही, हे अशक्य आहे. चार वर्षांपूर्वी भारत स्पर्धेतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा संघ म्हणून उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर आम्ही आमच्या नेट रनरेटने पाकिस्तानला अव्वल चारच्या अंतिम स्थानातून बाहेर ठेवण्यावर आमचे लक्ष होते.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “यावेळीही भारत आणखी मोठा दावेदार आहे. ते मायदेशात खेळत आहेत. तसेच, साखळी फेरीत त्यांनी खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, जेव्हा पराभूत होण्यासाठी काहीच नसते, तेव्हा न्यूझीलंड संघ जास्त खतरनाक होतो. जर भारत कोणत्याही संघाचा सामना करण्यासाठी चिंतीत असेल, तर तो न्यूझीलंड हा संघ आहे.”
माजी दिग्गजाने पुढे बोलताना म्हटले की, “आमच्यापुढे मोठे आव्हान आहे, पण 2019मध्येही असेच होते. हा दोन दिवसाचा सामना (पावसामुळे) होता. ही माझ्यासाठी विचित्र स्थिती होती. मी रात्री नाबाद होतो. हा कसोटी क्रिकेटमध्येही चिंतीत करणारे असते. वनडेचा तर विषयच सोडा आणि तेही विश्वचषक उपांत्य सामन्यात.”
भारताची स्पर्धेतील कामगिरी
भारतीय संघाने 2019 विश्वचषकाप्रमाणे यावेळीही साखळी फेरीत अव्वलस्थानी राहत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने नऊच्या नऊ सामने मिळवत 18 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेची चांगली सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडने 9 सामन्यांपैकी 5 विजयानंतर 10 गुणांसह साखळी फेरीतील चौथे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (world cup 2023 ind vs nz team india will be nervous in front of new zealand said ross taylor read)
हेही वाचा-
World-cup Semifinal: टॅास जिंकल्यावर ‘हाच’ निर्णय घ्या, गावसकरांचा रोहितला सल्ला
IND vs NZ: सेमीफायनलपूर्वी रैनाने ‘हिटमॅन’सोबत केली ‘या’ खेळाडूची तुलना; म्हणाला, ‘तो रोहितसारखाच…’