पुणे। यार्डी सॉफ्टवेअर आणि अॅक्सेंचर या संघांनी अमित जगताप व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवड येथील टेल्को मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने टिया संघावर नऊ गडी राखून सहज मात केली. यार्डी सॉफ्टवेअरच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून टिया संघाला १८ षटकांत ९४ धावांत गुंडाळले. यार्डी सॉफ्टवेअरकडून ऋषभ ताटिया, सौरभ शिंदे, रंजन शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
यानंतर स्वप्नील घाटगेच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर यार्डी सॉफ्टवेअर संघाने विजयी लक्ष्य ८.१ षटकांत एक गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. स्वप्नीलने २२ चेंडूंत ५ षटकार व ४ चौकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली.
यानंतर स्नेहल खामणकरच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अॅकसेंचर संघाने मास्टरकार्ड संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अॅकसेंचर संघाने मास्टरकार्डला ७.५ षटकांत ३३ धावांत गुंडाळले. यातील सहा फलंदाज शून्यावरच बाद झाले. स्नेहलने आठ बळी घेतले. अॅकसेंचरने विजयी लक्ष्य ५.५ षटकांत पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक ।
१) टिया – १८ षटकांत सर्वबाद ९४ (नवनाथ राजदेव ३१, अंगद जैन २१, ऋषभ ताटिया २-११, सौरभ शिंदे २-२२, रंजन शर्मा २-७) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर – ८.१ षटकांत १ बाद ९५ (स्वप्नील घाटगे नाबाद ५२, गौतम तुळपुळे नाबाद २७, अंगद जैन १-१४). सामनावीर – स्वप्नील घाटगे
२) मास्टरकार्ड – ७.५ षटकांत सर्वबाद ३३ (मंदार नायर नाबाद १४, स्नेहल खामणकर ८-१०) पराभूत वि. अॅकसेंचर – ५.५ षटकांत बिनबाद ३६ (आकाशसिंग नाबाद १६, तारु पटेल नाबाद १६). सामनावीर – स्नेहल खामणकर