इंडियन प्रीमियर लीगला 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधीच अनेक संघांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसतायेत. आतापर्यंत मोहम्मद शमी, मार्क वुड, जेसन रॉय आणि हॅरी ब्रूकसह अनेक स्टार खेळाडू आयपीएलच्या या हंगामातून बाहेर पडले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 13 खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणानं आयपीएलमधून बाहेर झाले आहेत.
आयपीएलमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंच्या ताज्या यादीत राजस्थान रॉयल्सचा ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर ॲडम झम्पाचा समावेश झाला. याशिवाय ‘बेबी मलिंगा’ म्हणून ओळखला जाणारा मथिशा पाथिरानाही चेन्नईच्या संघातून बाहेर झाला आहे.
झम्पानं वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तर पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. या दोघांच्या जाण्यामुळं त्यांच्या संघाचं गोलंदाजी आक्रमण निश्चितच कमकुवत झालं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाही दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. तर चेन्नईकडून खेळणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अंगठ्याच्या दुखापतीमुळे मे पर्यंत बाहेर आहे.
गुजरात टायटन्सचा मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. तो T20 विश्वचषकातही खेळू शकणार नाही. शमीवर नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडनंही गुजरात संघाला धक्का दिला आहे. तो पहिल्या 1 किंवा 2 सामन्यांमधून बाहेर असेल. तो देशांतर्गत शेफिल्ड शिल्ड स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे.
इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याला जूनमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे वुडनं वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून आयपीएलमधून आपलं नाव काढून घेतलं. आयपीएल 2024 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याला रणजी ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती.
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारे दोन इंग्लिश खेळाडू, जेसन रॉय आणि गस ऍटकिन्सन यांनीही आपली नावं मागे घेतली आहेत. सलामीवीर जेसन रॉयनं वैयक्तिक कारणांमुळे आपलं नाव मागे घेतलं, तर ॲटकिन्सनला जूनमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकनं वैयक्तिक कारणांमुळे आपलं नाव मागे घेतलं. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं 4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
टी 20 क्रिकेटचा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवनंही मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवलं आहे. जानेवारीत त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. तो मुंबईच्या सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर राहू शकतो.
दुखापतीमुळे बाहेर पडलेले खेळाडू –
सूर्य कुमार यादव* (मुंबई इंडियन्स) काही सामन्यांतून बाहेर , डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स), मथिशा पाथिराना (चेन्नई सुपर किंग्स), प्रसिध्द कृष्णा (राजस्थान रॉयल्स), मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स), दिलशान मदुशंका (मुंबई इंडियन्स), जेसन बेहरेनडॉर्फ (मुंबई इंडियन्स)
वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडलेले खेळाडू –
हॅरी ब्रूक (दिल्ली कॅपिटल्स), जेसन रॉय (कोलकाता नाइट रायडर्स), ॲडम झम्पा (राजस्थान रॉयल्स)
वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बाहेर पडलेले खेळाडू –
गस ऍटकिन्सन (कोलकाता नाइट रायडर्स), मार्क वुड (लखनऊ सुपर जायंट्स),
इतर कारणांमुळे बाहेर – मॅथ्यू वेड (गुजरात टायटन्स) शेफिल्ड शील्ड स्पर्धा खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?
“मोहम्मद शमी माझी हत्या करू शकतो”, पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप