भारतीय क्रिकेट संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही क्रिकेटविश्वात नावलौकिक मिळवला आहे. अनेकदा भारतीय फलंदाज जबरदस्त प्रदर्शन करत मोठ-मोठ्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवतात. तर, भारतीय गोलंदाज त्यांच्या दमदार गोलंदाजी शैलीने मोठ-मोठ्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवतात. एकंदरीत भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज हे एकमेकांना पूरक खेळ करत असतात.
गरज पडल्यास बऱ्याचदा भारतीय फलंदाजांनी गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. तर, वेळ आल्यास गोलंदाजांनाही जबरदस्त फलंदाजी करताना सर्वांनी पाहिले आहे. सध्याचे खेळाडू पाहायचे झाले तर, केदार जाधव, सुरेश रैना इत्यादी फलंदाज गरजेनुसार पार्ट टाईम गोलंदाजी करतात. तर, पुर्वी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग हे दिग्गज फलंदाजही आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघाला गोंधळून टाकत होते.
या लेखात काही निवडक दिग्गज भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पार्ट टाईम गोलंदाजी करताना सामन्याच्या एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. ज्याला क्रिकेटच्या भाषेत ५ विकेट्स हॉल असे म्हणतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ विकेट्स हॉल घेणारे ४ भारतीय फलंदाज- 4 Indian Batsman Who Took 5 Wickets Haul In International Cricket
१. कृष्णमचारी श्रीकांत –
भारताचे माजी फलंदाज कृष्णमचारी श्रीकांत यांनी १० डिसेंबर १९८८मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात हा कारनामा केला होता. यावेळी सामन्यातील ७ षटके गोलंदाजी करत २७ धावा देत श्रीकांत यांनी ५ विकेट्स घेतल्या होत्या. याच सामन्यात श्रीलंका यांनी सलामीला फलंदाजी करताना ७० धावा केल्या होत्या. भारताने तो सामना २२ चेंडू राखून ४ विकेट्सने जिंकला होता.
२. विरेंद्र सेहवाग –
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या कामगिरीने भारताला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. परंतु, या दमदार फलंदाजांने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पार्ट टाईम गोलंदाजी करत ५ विकेट्स हॉल घेण्याचाही पराक्रम केला आहे. २९ ऑक्टोबर २००८ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सेहवागने ४० षटके गोलंदाजी केली होती. दरम्यान त्याने १०४ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. विशेष म्हणजे, पहिल्या डावात फक्त एका धावेवर बाद होणाऱ्या सेहवागने गोलंदाजीत दमदार कामगिरी केल्यामुळे तो सामना त्याच्या अविस्मरणीय क्षणांमध्ये सामील झाला.
३. सौरव गांगुली –
भारतीय क्रिकेट संघाचा दादा म्हणजेच सौरव गांगुलीला त्याच्या दमदार फलंदाजी आणि उत्कृष्ट नेतृत्वासाठी ओळखले जाते. परंतु, गांगुलीने वनडेत गरजेनुसार गोलंदाजी करत २ वेळा ५ विकेट्स हॉल घेण्याचा पराक्रम केला आहे.
१८ सप्टेंबर १९९७ला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात गांगुली सलामीला फलंदाजी करताना फक्त २ धावांवर बाद झाला होता. मात्र, त्याने त्याच सामन्यात १० षटके गोलंदाजी करताना १६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. भारताने तो सामना ३४ धावांनी जिंकला होता. गांगुलीला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
गांगुलीने दुसऱ्यांदा हा पराक्रम ११ डिसेंबर २०००ला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात केला होता. यावेळी गांगुलीने १० षटकात ३४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय फलंदाजी करताना गांगुलीने नाबाद ७१ धावा केल्या होत्या. भारताने तो सामना १५० चेंडू राखून ९ विकेट्सने जिंकला होता.
४. सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फलंदाजीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. सचिनने फलंदाजीव्यतिरिक्त गरजेनुसार गोलंदाजी करत बरेच पराक्रम केले आहेत. त्याने वनडेत २ वेळा ५ विकेट्स हॉल घेण्याचा कारनामा केला आहे.
१ एप्रिल १९९८ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वप्रथम त्याने ही कामगिरी केली होती. यावेळी फलंदाजी करताना सचिन फक्त ८ धावांवर बाद झाला होता. परंतु, त्याने त्याच सामन्यात १० षटके टाकत ३२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होेत्या. भारताने तो सामना ४१ धावांनी जिंकला होता.
तर, २ एप्रिल २००५ला सचिनने पुन्हा ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. यावेळी सचिन फलंदाजी करताना फक्त ४ धावांवर बाद झाला होता. परंतु त्याने १० षटके गोलंदाजी करताना ५० धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. भारताने तो सामना ८७ धावांनी जिंकला होता.