मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने रविवारी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. फेअरवेलचा सामना न खेळताच धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला.
त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 23 डिसेंबर 2004 रोजी झाली होती, तर त्याने शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी खेळला होता. धोनीची कारकीर्द ज्या प्रकारे सुरू झाली, त्याप्रकारे शेवटही झाला. तो योगायोग आहे. खरं तर धोनी पहिल्या आणि शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
एमएस धोनी ने 23 डिसेंबर 2004 रोजी चितगाव येथे बांगलादेशविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धोनी पहिल्याच सामन्यात खाते न उघडता धावबाद झाला. त्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 180 अशी होती. दुसर्या बाजूने मोहम्मद कैफ 71 धावांवर नाबाद होता.
यावेळी धोनीने त्याच्या कारकिर्दीचा पहिला बॉल खेळला. जेव्हा कैफ जरा पुढे आला, तेव्हा धोनी धावा करण्यासाठी धावला पण कैफने पुन्हा त्याला परत जाण्यास सांगितले. पण धोनी क्रीजवर परतला, तोपर्यंत तो बाद झाला होता. या सामन्यात धोनीला भोपळादेखील फोडता आला नाही.
2019 विश्वचषक उपांत्य फेरी धोनीच्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याचे सिद्ध झाले. धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धावबाद झाला. लॉकी फर्ग्युसन 49 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूंवर एकही धाव घेतला नाही. तो षटकातील तिसर्या चेंडूवर दोन धावा करण्याचा प्रयत्न करीत होता आणि तो धावबाद झाला. त्याच्या शेवटच्या सामन्यात धोनी अर्धशतक झळकावून धावबाद झाला होता. त्यांनंतर कोट्यावधी भारतीयांच्या आशा देखील संपुष्टात आल्या. हा सामना गमावल्यानंतर भारत स्पर्धेतून बाद झाला.
धोनीने आपल्या कारकीर्दीत 90 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय भारताचे 350 वनडे आणि 98 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनीने कसोटीत सहा शतके तर वनडेमध्ये दहा शतके केली आहेत.