आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१०० खेळाडू आत्तापर्यंत किमान एकतरी सामना खेळले आहेत. यातील अनेक खेळाडूंनी मोठी कामगिरी करत नाव गाजवले. पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे प्रंचड प्रतिभा होती. मात्र त्यांना त्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. अशा काही क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
खूप जास्त अपेक्षा असताना भ्रमनिरास केलेले ७ क्रिकेटपटू –
१. डॅरेन ब्रावो –
२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या डॅरेन ब्रावोने सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. त्याची तुलना ब्रायन लाराशीही झाली. विशेष म्हणजे पहिले १२ कसोटी सामने खेळल्यानंतर लाराच्या जेवढ्या धावा होत्या, तेवढ्याच धावा ब्रावोच्या देखील होत्या. पण चांगली सुरुवात करुनही ब्रावोला पुढे अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
त्याने ५४ कसोटी, ११३ वनडे आणि २० टी२० सामने खेळले आहे. यात त्याने वनडेत ३०.५४ च्या सरासरीने २९०२ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत ३७.६९ च्या सरासरीने ३५०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी२० मध्ये ३४० धावा केल्या आहेत.
२. कुशल मेंडिस –
कुशल मेंडिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार सुरुवात केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली केली. मात्र त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते.
त्याने आत्तापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले पण यात त्याला केवळ ७ शतकांसह २९९५ धावाच करता आल्या. तर त्याने ७६ वनडे सामने खेळले असून ३०.५२ च्या सरासरीने २१६७ धावा केल्या आहेत. यात त्याला केवळ २ शतकेच करता आली आहेत. याबरोबरच त्याने २६ टी२० सामने खेळताना १८.६१ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या आहेत.
३. कार्लोस ब्रेथवेट –
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू कार्लोस ब्रेथवेट सर्वांना २०१६ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर मारलेल्या सलग ४ षटकारांमुळे लक्षात आहे. तसेच त्याने २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतकी खेळी केली होती. मात्र या व्यतिरिक्त त्याला खास काही करता आले नाही.
त्याने २०११ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २०१५ मध्ये त्याने कसोटीत पदार्पण केले. पण त्याला आत्तापर्यंत केवळ ३ कसोटी सामनेच खेळता आले. यात त्याने १८१ धावा केल्या आणि केवळ १ विकेट घेतली.
तसेच त्याने आत्तापर्यंत ४४ वनडे सामने खेळले असून १६.४४ च्या सरासरीने ५५९ धावा आणि ४३ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२०मध्ये त्याने ४१ सामने खेळताना १४.७६ च्या सरासरीने ३१० धावा केल्या आहेत आणि ३१ विकेट्स घेतल्या आहेत.
४. तेंबा बाऊमा –
दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज तेंबा बाऊमाने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. त्याने त्याच्या सातव्या कसोटी सामन्यातच इंग्लंड विरुद्ध नाबाद शतक ठोकले. मात्र आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे एकमेव कसोटी शतक ठरले. त्याने आत्तापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने या शतकासह ३०.७५ च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर ६ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. पण त्याची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी सध्यातरी चांगली आहे. त्याने वनडेत ५५.८३ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. तर टी२०मध्ये ४९.७५ च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत.
५. जीत रावल –
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज जीत रावलने २०१६ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण अजून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही.
भारतीय वंशाचा असलेल्या जीतचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. तसेच पार्थिव पटेल ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत जीतने सुरुवातीला शिक्षण घेतले होते. पण नंतर तो कुटुंबासमवेत न्यूझीलंडला स्थायिक झाला. त्याने आत्तापर्यंत २४ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने यात ३०.०७ च्या सरासरीने १ शतकासह ११४३ धावा केल्या आहेत.
६. मिशेल मार्श –
क्रिकेटचा वारसा असलेल्या कुटुंबातच जन्म झालेला मिशेल मार्शमध्येही अष्टपैलू खेळ करण्याची प्रतिभा आहे. मात्र सातत्याने संधी मिळूनही त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
त्याने २०११ ला वनडे आणि टी२०मध्ये पदार्पण केले होते. तर कसोटीत त्याने २०१४ ला पदार्पण केले. त्याने त्याच्या कारकिर्दीत ३२ कसोटी सामने खेळले. तसेच ५७ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले आहेत.
कसोटीत त्याने २५.२० च्या सरासरीने १२६० धावा केल्या आहेत. तसेच ४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्याने ३४.९७ च्या सरासरीने १५३९ धावा केल्या आहेत आणि ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२०मध्ये त्याने २१९ धावा आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत.
७. विनोद कांबळी –
एकेकाळी सचिन तेंडुलकरप्रमाणेच प्रतिभाशाली मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळीने १९९१ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण कारकिर्दीच्या सुरुवातीपासून अनेक वादांमुळे कांबळी चर्चेत राहिला.
कारकिर्दीची चांगली सुरुवात केलेल्या कांबळीच्या कामगिरीत नंतर सातत्य राहिले नाही. पर्यायाने त्याला भारतायी संघातील स्थान गमवावे लागले. त्याने त्याच्या कारकिर्दीत १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले. कसोटीत त्याने ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या. तर वनडेत ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या.