क्रिकेट विश्वात सध्या फ्रेंचाइजी टी 20 क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशांनी आपली स्वतःची फ्रेंचाइजी टी 20 स्पर्धा सुरू केली आहे. भारतामध्ये सुरू असलेली आयपीएल, ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा मानली जाते. यासोबतच बिग बॅश लीग, पीएसएल व श्रीलंका प्रीमियर लीगनेही आपल्या उत्तम क्रिकेट साठी प्रसिद्धी मिळवली आहे. आपण या लेखात या सर्व लीगमधील 11 खेळाडूंचा संघ पाहणार आहोत ,जो जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला पराभूत करू शकेल. तर बघुयात कोण आहेत ते टॉप 11 खेळाडू.
1) मार्कस स्टॉयनिस –
मार्कस स्टॉयनिसने यावर्षी बिग बॅश लीग व आयपीएलमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. स्टॉयनिस बिग बॅश लीग मध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळताना डावाची सुरुवात करतो, व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून फिनिशरच्या भूमिकेत खेळतो. दोन्ही भूमिकेमध्ये स्टॉयनिसने उत्तम कामगिरी केलेली आहे.
2) के एल राहुल –
भारताचा स्टार ओपनर के एल राहुलने 2020 आयपीएल मध्ये आपल्या बॅटिंगने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. राहुलने 2020 आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावा जमवत ऑरेंज कॅप मिळवली होती. राहुलने खेळलेल्या 14 सामन्यात तब्बल 670 धावा ठोकलेल्या आहेत .
3) बाबर आजम –
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेट खेळाडू बाबर आजमने 2020 वर्षात झालेल्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. बाबरने खेळलेल्या 11 सामन्यात तब्बल 5 अर्धशतकांचा मदतीने 473 धावा केलेल्या आहेत.
4) ईशान किशन –
भारताचा युवा खेळाडू ईशान किशनने आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना षटकारांची आतषबाजी केली होती. अनेक दिग्गज खेळाडूंना पछाडत आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला होता. ईशानने आयपीएल मध्ये तब्बल 57 च्या सरासरीने 516 धावा बनवल्या आहेत.
5) किरॉन पोलार्ड ( कर्णधार)-
आयपीएल व सीपीएल मध्ये पोलार्डने उत्तम कामगिरी केलेली आहे . सीपीएल मध्ये त्रिनिदाद नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवत पोलार्डने संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने मुंबई इंडियन्सचे काही सामन्यात कर्णधार पद देखील भूषवले होते. सीपीएल मध्ये खेळलेल्या 11 सामन्यातील 7 डावात पोलार्डने 207 धावा बनवल्या होत्या , तसेच गोलंदाजीत 8 बळी देखील मिळवले आहेत. पोलार्डच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
6) वानिंदू हसरंगा –
श्रीलंकेच्या 23 वर्षीय वानिंदू हसरंगाने नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने संघासाठी अनेक महत्वाचे सामने जिंकून दिले आहे. हसरंगाने 10 सामन्यात 17 बळी मिळवले, तसेच फलंदाजीत तब्बल 161 च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या.
७) राशिद खान –
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने आपल्या खेळाने संपूर्ण टी 20 क्रिकेटवर अधिराज्य गाजवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसीच्या अवॉर्ड्समध्ये राशिदला दशकातील सर्वोत्तम टी 20 खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.आयपीएल 2020 मध्ये राशिने तब्बल 20 बळी मिळवले होते. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 5.37 राहिला आहे.
8) कागीसो रबाडा –
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागीसो राबडा आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. रबाडा ने केवळ 17 सामन्यात तब्बल 30 फलंदाजांना बाद केले होते .
9) इम्रान ताहीर –
पाकिस्तान सुपर लीग मध्ये इम्रान ताहीरने उत्तम कामगिरी केलेली आहे. आयपीएल मध्ये ताहीरला पुरेशी संधी मिळाली नाही पण पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळताना त्याने 11 बळी मिळवले होते. तसेच सीपीयलमध्ये देखील त्याने 15 बळी मिळविले आहेत.
10) ट्रेंट बोल्ट –
आयपीएल 2020 मध्ये ट्रेंट बोल्टने आपल्या गोलंदाजीने मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बोल्टने आयपीएल मध्ये तब्बल 25 बळी मिळवले होते. फायनल मध्ये देखील त्याने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत सामनावीरचा पुरस्कार मिळवला होता.
11) शाहीन आफ्रिदी –
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पीएसएल मध्ये पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. पीएसएल 2020 मध्ये आफ्रिदीने तब्बल 17 बळी मिळवले होते. यावेळी त्याची गोलंदाजीची सरासरी 17.20 इतकी उत्तम होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रमवारीत कोहली, स्मिथवर वरचढ ठरूनही विलियम्सनला नाही गर्व, म्हणाला…
आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ‘हे’ ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश
सिडनी कसोटी जिंकायची, तर टीम इंडियातील ‘या’ तीन खेळाडूंना कराव्या लागतील सुधारणा