वेस्ट इंडीजचे रॉय गिलख्रिस्ट हे त्यांच्या वेगवान गोलंदाजी आणि बाउन्सरसाठी ओळखले जात. ते फलंदाजांना खूप त्रस्त करत असत. बाकी वेस्ट इंडीयन वेगवान गोलंदाजांइतके ते उंच नव्हते पण, त्यांची गोलंदाजी कौशल्ये अतिउच्च दर्जाची होती. रॉय यांची कसोटी कारकीर्द केवळ दोन वर्षांची होती. ज्यात, त्यांनी १३ सामने खेळले. प्रथमश्रेणी कारकीर्ददेखील साडेसहा वर्षाचीच राहिली. त्यांच्या, लघु कारकीर्दीमागील एक प्रमुख कारण, त्यांची गोलंदाजीतील आक्रमकता होती. रॉय गिलख्रिस्ट वेगाने गोलंदाजी करत, फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी ते कुप्रसिद्ध होते. त्यांची भितीदायक गोलंदाजी खेळणे फलंदाजांसाठी नेहमी अवघड जात.
रॉय हे कधीच आपल्या कर्णधाराने दिलेल्या सूचना पाळत नसतं. विरोधी संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची त्यांना आवड होती. १९५९ मध्ये रॉय यांनी इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या अवघ्या पाच महिने आधीच त्यांनी आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला होता. रॉय यांनी २५ वर्षाचे होण्याआधीच आपला अखेरचा सामना सुद्धा खेळला होता. तत्कालीन वेस्ट इंडीज कर्णधार गॅरी अलेक्झांडर यांनी भारतीय उपखंडातील दौऱ्याच्या मध्यातून त्यांना वगळले होते. या दौऱ्यात, वेस्ट इंडिज संघ भारत व पाकिस्तानचा सामना करत होता.
भारतातील सामन्यांदरम्यान, अलेक्झांडर यांनी दिलेल्या सूचनांनंतरही, गिलख्रिस्ट धोकादायक गोलंदाजी करत होते. या दौर्यादरम्यान त्यांनी दोन भारतीय फलंदाजांच्या डोक्यावर चेंडू मारले होते. त्यामुळे, अलेक्झांडर यांना रॉय यांच्यावर कारवाई करावी लागली. संघातून वगळल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत ते फक्त एक प्रथमश्रेणी सामना खेळले. त्यानंतर काही काळ ते लँकेशायर लीगमध्ये सहभागी झाले. १९६२-६३ च्या हंगामात, गिलख्रिस्ट हैदराबाद रणजी संघासाठी खेळायला आले. एका रणजी व्यतिरिक्त ते अजून पाच सामने भारतामध्ये खेळले.
गिलख्रिस्ट यांनी, सहा हंगाम लँकेशायर लीग व वॉर्ली कपमध्ये भाग घेतला. १९६५ मध्ये लँकेशायर लीगमधील, क्रॉम्प्टन संघासाठी त्यांनी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात पाच गडी बाद करत क्रॉम्प्टन संघाला रॉयटन संघाविरुद्ध ३ धावांनी विजय मिळवून दिला.
पुढच्या सामन्यात, रॅडफ्लिक संघाने क्रॉम्प्टन संघाला अवघ्या १०६ धावांवर बाद केले. रॅडफ्लिक संघाच्या हिल्टन यांनी अवघ्या १०.१ षटकात ६ बळी मिळवत क्रॉम्प्टन संघाला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर, डेरेक बिकले व बिल मॅकडोनाल्ड या रॅडफ्लिकच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. रॉय गोलंदाजीला येण्याआधी, त्यांनी दोन षटकात चार धावा बनविल्या होत्या.
रॉय यांनी गोलंदाजी सुरू करताच, वेगवान बाउन्सर आणि बीमरचा मारा चालू केला. प्रतिस्पर्धी कर्णधार बिकले यांना पहिल्या षटकात त्यांनी अडचणीत आणले. नंतर-नंतर तर ते, बाउन्सर न टाकता फक्त बीमर टाकू लागले. हे बीमरसुद्धा ते पॉपिंग क्रिझमधून न टाकता १८ यार्डावरूनच टाकत होते.
बिकले यांनी ही गोष्ट पाहिली आणि गिलख्रिस्ट यांना नियमानुसार गोलंदाजी करण्यास सांगितले. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची होऊन जराशी हातापायी सुद्धा झाली. पण, मनमानी करणाऱ्या गिलख्रिस्ट यांनी आपली गोलंदाजी तशीच सुरू ठेवली. शेवटी, बिकले यांनी वैतागून मॅकडोनाल्ड यांच्यासह मैदान सोडले. स्पर्धेच्या नियमानुसार, एखादा संघ मधेच सामना सोडत असेल तर दुसऱ्या संघाला विजयी घोषित केले जात. त्यामुळे, क्रॉम्प्टन संघाला सामना बहाल करण्यात आला.
७ ऑगस्ट रोजीच्या या घटनेनंतर रॉय व बिकले यांना स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून निलंबित करण्यात आले. १९६० मध्ये देखील, गिलख्रिस्ट यांच्या गोलंदाजीमुळे ओल्डहॅम संघाने असाच सामना सोडून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
फिरकीपटू राशिदच्या गोलंदाजीची दहशत! यष्टीरक्षकाने केली अशी काही कृती, चाहतेही गेले गोंधळून
‘माझी पत्नी खुश नाही’; बांगलादेशविरुद्ध लाजिरवाणे प्रदर्शन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रीया